दिल्लीचे मुख्यमंत्री सिसोदिया यांचा केंद्र सरकारवर आरोप

घरोघरी शिधावाटप करण्याची दिल्ली सरकारची योजना केंद्राने फेटाळल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यांशी संघर्ष करत आहेत, अशी टीका सिसोदिया यांनी केली. गरिबांसाठी घरपोच शिधावाटपाच्या योजनेचा प्रस्ताव मान्य करता येणार नाही, असे केंद्राने कळविल्याचे सिसोदिया यांनी नमूद केले. प्रस्ताव फेटाळताना केंद्राने दिलेली कारणे हास्यास्पद असल्याचे सिसोदिया यांनी नमूद केले. याचे वितरण करणाऱ्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले तर अरुंद गल्ल्या तसेच उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तुम्ही कसे वितरण कराल, असा अनाकलनीय सवाल हा प्रस्ताव फेटाळताना विचारल्याचा दावा सिसोदिया यांनी केला.

शिधावाटपाचा मुद्दा हा राज्यांचा विषय आहे. जर पिझ्झा किंवा कपडे तसेच अन्य वस्तू घरपोच मिळत असतील तर शिधावाटपात काय अडचण आहे, असा सवाल सिसोदिया यांनी केला. महाराष्ट्र तसेच पश्चिम बंगाल या राज्यांविरोधात केंद्राच्या संघर्षाचे उदाहरण देत सिसोदिया यांनी पंतप्रधानांवर टीका केली. गेल्या ७५ वर्षांत असे राज्यांशी वाद घालणारे पंतप्रधान पाहिले नाही, अशी टिप्पणी सिसोदिया यांनी केली. जूनपासून घरपोच शिधावाटप करण्याची दिल्ली सरकारची योजना होती. दिल्लीच्या नायब राज्यपालांनी त्याबाबतच्या योजनेची फाइल परत पाठविल्याने त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. ही योजना अमलात आली तर ७२ लाख नागरिकांना त्याचा लाभ होईल, असा दिल्ली सरकारचा दावा आहे.