निर्बंध शिथिल; मेट्रो-बससेवा पूर्ण क्षमतेने

नवी दिल्ली : करोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने दिल्लीत निर्बंध शिथिल करण्यात आले असून, जवळपास वर्षभरानंतर मेट्रो रेल्वे व दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) बसगाडय़ा सोमवारपासून पूर्ण आसनक्षमतेने धावू लागल्या. तसेच चित्रपटगृहे, नाटय़गृहे निम्म्या आसनक्षमतेने खुली करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे १० मेपासून मेट्रो रेल्वेसेवा स्थगित करण्यात आली होती. ७ जूनपासून निम्म्या आसनक्षमतेने मेट्रोसेवा सुरू झाली होती. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शनिवारी नव्या आदेशाद्वारे निर्बंध शिथिल केले. त्यामुळे मेट्रो पूर्ण क्षमेतेने सुरू करण्यात आली. सोमवारी सकाळपासून अनेक मेट्रो स्टेशनबाहेर मोठय़ा रांगा लागल्या होत्या. वास्तविक, मेट्रो स्टेशनचा फक्त एकच दरवाजा प्रवेश करण्यासाठी उघडला जात असल्याने यापूर्वीही मेट्रो स्टेशनबाहेर मोठय़ा रांगा पाहायला मिळत होत्या. आता १६ स्टेशनवरील अतिरिक्त १६ दरवाजेही खुले केल्यामुळे सर्व मेट्रो स्टेशनचे एकूण २७६ दरवाजे प्रवाशांसाठी खुले झाले आहेत, अशी माहिती दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने दिली. मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू झाली असली तरी अत्यावश्यक असेल तरच लोकांनी प्रवास करावा, तसेच करोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

मेट्रोच्या एका डब्यात सुमारे ३०० प्रवाशी असतात. ५० प्रवाशांना बसून प्रवास करता येतो, तर २५० प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात. सध्या उभे राहून प्रवास करण्याची मुभा नसल्याने मेट्रोच्या एका डब्यात फक्त ५० प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्यापूर्वी २५ प्रवाशांनाच प्रवास करता येत होता. दिल्लीत मेट्रोच्या १० मार्गावर २४२ स्टेशन्स आहेत. डीटीसी बसही पूर्ण क्षमतेने धावत असून याआधी जास्तीत जास्त २० प्रवाशांना जाता येत होते, आता ४०-४२ प्रवाशी बसून प्रवास करू शकतात. दिल्लीत करोनाचा संसर्गदर ०.०९ टक्के आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेतील शिखरकाळात दिल्लीत २० एप्रिल रोजी एका दिवसात विक्रमी २८,३९५ नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

* मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू, स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी अतिरिक्त दरवाजे.

* चित्रपटगृहे, नाटय़गृहे, मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू

* ई-रिक्षामध्ये दोन प्रवासी, टॅक्सी, कॅबमध्येही दोन प्रवाशांना मुभा

* धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी; भाविकांच्या प्रवेशास मनाई

* क्रीडांगण व क्रीडा संकुले प्रेक्षकांविना सुरू करण्याची मुभा

* लग्नासाठी १०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी

* शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शिकवण्यांचे वर्ग बंदच