उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथिल रुग्णालयात प्राणवायूचा पुरवठा रोखल्याने झालेल्या बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. तीन दिवसांनी १६ ऑगस्ट रोजी ही बैठक होणार आहे.

या बैठकीत केजरीवाल दिल्लीतील रुग्णालयांची स्थिती जाणून घेणार आहेत. यामध्ये रुग्णालयांतील औषधे, ऑक्सिजन सिलेंडर्स, जीवरक्षक औषधे आदींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत आहे की नाही याचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्याचबरोबर या सर्व कारभाराची ‘ब्लू प्रिंट’ही त्यांनी मागवली आहे.

एखाद्या दुर्घटनेनंतरच अशा प्रकारे कार्यवाही होणे खरंतरं अपेक्षित नाही. त्यासाठी सर्वकाळ सज्जता ही महत्त्वाची बाब आहे. मात्र, गोरखपूरच्या घटनेनंतर याकडे केंद्र आणि राज्य सरकारे किती गंभीर्याने पाहतात हे दिसून आले आहे.

गोरखपूर येथिल बाबा राघवदास मेडिकल कॉलेजकडून ऑक्सिजन पुरवठादार कंपनीचे बिल थकल्याने या रूग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे सुमारे ६० लहान मुलांचा मृत्यू ओढवला आहे.