उत्तर दिली भागातील इंद्रलोक पोलीस ठाण्यावर जमावाने केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी जमावातील एका व्यक्तीने पोलीस ठाण्याच्या परिसरात गोळीबार केल्याचंही समजतंय. इंद्रलोक परिसरातील एका बेकरीमध्ये चोरी केल्याच्या आरोपावरुन दिल्ली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं होतं. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी बुधवारी रात्री पोलीस ठाण्यात आलेल्या साथीदारांनी रात्री अकरा वाजल्याच्या दरम्यान, काठी आणि दगडांनी पोलीस कर्मचाऱ्यांवरच हल्ला केला.

अखलाख हा इसम दिल्लीतील इंद्रलोक भागात बेकरी चालवतो. दुकानाच्या मालकाचा मुलगा सादकीन आणि त्याच्या काही मित्रांनी बुधवारी रात्री दहा वाजल्याच्या दरम्यान बेकरीमध्ये जात अखलाखला त्रास द्यायला सुरुवात केली. बेकरीतील काही पदार्थ खायला घेत सादकीनने त्याचे पैसे देण्यास अखलाखला नकार दिला. ज्यावेळी अखलाखने सादकीनला पदार्थ देण्यास नकार दिला तेव्हा सादकीनने आपल्या मित्रांसह अखलाखला मारहाण करत बेकरीतले खाद्यपदार्थ लुटून नेले. हा प्रकार घडल्यानंतर अखलाखने पोलीस ठाण्यात याविरुद्ध तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बेकरीवर आलेल्या काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मात्र पोलीस चौकीत आरोपींनी पोलिसांशीच हुज्जत घालायला सुरुवात केली. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. काहीवेळानंतर, अज्ञात व्यक्तींनी पोलिस ठाण्यात येत पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यातील एकाने गोळीबारही केला. अटक केलेल्या आरोपींना सोडण्याची मागणी ही लोकं करत होती. या हल्ल्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती DCP मोनिका भारद्वाज यांनी दिली. पोलिसांनी याप्रकरणी बेकरीच्या मालकाचा मुलगा सादकीन, आशकीन आणि शाहरुख यांना अटक केली असून उर्वरित आरोपी फरार आहेत.