News Flash

शरद यादव यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द होणार

दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगितीला दिला नकार

जेडीयूचे नेते शरद यादव. (संग्रहित छायाचित्र)

संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) बंडखोर खासदार शरद यादव यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याबाबच्या राज्यसभा सभापतींच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास आज दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. यामुळे शरद यादव यांना चांगलाच झटका बसला असून त्यांचे सदस्यत्व रद्द होणार आहे.

राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी आपले राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले. मात्र त्यांनी आपल्याला बाजू मांडण्यासाठी दुसरी संधीच दिली नाही. त्यामुळे त्यांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका शरद यादव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती, यावर न्यायालयाने हा निकाल दिला. यामुळे शरद यादव यांचे सदस्यत्व रद्द होणार असले तरी त्यांना राज्यसभा सदस्य म्हणून मिळणारे भत्ते, बंगला या बाबींचे लाभ देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

जदयूचे राज्यसभेतील खासदार शरद यादव आणि अली अन्वर या बंडखोर नेत्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजद आणि काँग्रेससोबतचे महागठबंधन तोडून भाजपसोबत घरोबा करणाऱ्या निर्णयाचा निषेध केला होता. त्यानंतर पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवत यादव यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी जदयूने राज्यसभा सभापतींकडे केली होती. त्यानुसार, ४ डिसेंबर रोजी राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शरद यादव आणि अली अन्वर यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश दिला होता.

त्यानंतर सभापतींच्या या आदेशाला आव्हान देणारी याचिका शरद यादव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने सभापतींच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यात नकार दिला. त्यामुळे शरद यादव यांना मोठा झटका बसला असून त्यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द झाल्यात जमा आहे. २०२२ पर्यंत यादव यांचा सदस्यत्वाचा कार्यकाळ होता तो पूर्ण होण्याआधीच त्यांना पायउतार व्हावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 6:31 pm

Web Title: delhi hc denies interim stay on sharad yadavs disqualification as rajya sabha mp
Next Stories
1 सभागृहात ‘आय बेग’ शब्द वापरू नका; आपला देश स्वतंत्र आहे- व्यंकय्या नायडू
2 काँग्रेसला सुप्रीम कोर्टाकडून झटका; इव्हीएम छेडछाड वादावरील याचिका फेटाळली
3 ‘हिवाळी अधिवेशनात गोंधळ घालणे चुकीचे’
Just Now!
X