तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत आपल्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून पत्नीही गंभीर जखमी झाली, त्यामुळे आपल्याला वाढीव नुकसानभरपाई मिळावी ही याचिकाकर्त्यांची मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश जी.रोहिणी व न्या. आर.एस एंडलॉ यांनी मेघ सिंग यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. याचिकेत त्यांनी असे म्हटले होते की, दंगलग्रस्त म्हणून  दिल्ली सरकारने आपल्याला दोन हजार रूपयांचा धनादेश पाठवला होता पण ती रक्कम पुरेशी नाही. महत्त्वाची बाब अशी की, याचिकादाराला २००० रू.चा धनादेश मिळाला.
भरपाई अपुरी आहे हे याचिकादाराला सिद्धी करता आले नाही असे सांगून न्यायालयाने म्हटले आहे की, याचिकादाराने दाखल केलेली कागदपत्रे, त्याच्या पत्नीची वैद्यकीय कागदपत्रे  पाहिली, त्यांच्या पत्नीला गंभीर जखमा झाल्या होत्या हे दिसून येते, पण मालमत्तेचे नुकसान झाल्याचे कुठलेही पुरावे नाहीत.
अशिक्षित, दरिद्री व वृद्ध असल्याने याचिका दाखल करण्यास विलंब झाल्याची कारणमीमांसाही न्यायालयाने फेटाळली, यापूर्वी न्या. मनमोहन यांच्या एक सदस्यीय न्यायालयाने भरपाईची मागणी फेटाळताना त्या पुष्टय़र्थ कागदपत्रे दाखल करण्यास याचिकादारास अपयश आल्याचे म्हटले होते.
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजधानीत मोठय़ा प्रमाणावर उसळलेल्या जातीय दंगलींमध्ये शीख समुदायास प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात दोन ते तीन हजार लोकांना ठार मारण्यात आले. राजकीय वर्तुळातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते.