दिल्लीत १९९८ मध्ये झालेल्या सांगीतिक कार्यक्रमानंतर प्राप्तिकर विभागाने आपल्याला धमकी देऊन सोनी म्युझिक (इंडिया) लि.च्या विरोधात निवेदन घेतल्याचा दावा गायक रिकी मार्टिन याने एका पत्राद्वारे केल्याने प्राप्तिकर विभागाचे अधिकारी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

प्राप्तिकर विभागाच्या उपायुक्तांना १९९९ मध्ये लिहिलेल्या पत्राने दिल्ली उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्यामुळे प्राप्तिकर विभागाने म्युझिक कंपनीविरोधात सुरू केलेली कारवाई न्यायालयाने फेटाळून लावली. सोनी म्युझिकवर करदायित्व लादण्यासाठी प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी निवेदन घेतले, असा दावा मार्टिन याने केला. आपण कंपनीशी कार्यक्रमाबाबत अथवा भारतात त्या कार्यक्रमाच्या श्राव्य फितींची विक्री करण्याबाबत कोणताही करार केलेला नव्हता, असा दावाही मार्टिन याने केला आहे.

दिल्लीतील हॉटेल रॅडिसनमध्ये ७ डिसेंबर १९९८ रोजी प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी शपथेवर निवेदन घेतले त्याबाबत मार्टिन याने म्हटले आहे की, आपल्याला या निवेदनावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आले.