न्यायालय अवमान कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान

न्यायालय अवमान कायद्याच्या (कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट्स अ‍ॅक्ट) घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी सध्या तुरुंगात असलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस.सी. कर्णन यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.

या याचिकेत काही गुणवत्ता असल्याचे आम्हाला दिसत नाही, त्यामुळे आम्ही ती फेटाळत आहोत, असे प्रभारी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल व न्या. सी. हरिशंकर यांच्या खंडपीठाने सांगितले.

आपल्याला ६ महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावताना नैसर्गिक न्यायाची तत्त्वे अमलात आणली गेली नाहीत, हा याचिकाकर्त्यांने केलेला युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला. कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि कार्यवाही, तसेच त्यांच्याविरुद्ध असलेला पुरावा यांची संपूर्ण माहिती होती, असे कर्णन यांचा पत्रव्यवहार आणि वर्तणूक यावरून दिसून आले आहे, असेही खंडपीठ म्हणाले.

कर्णन यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती, तसेच स्वत:चा बचाव करण्याची पुरेशी आणि वारंवार संधी दिली होती, याचाही खंडपीठाने उल्लेख केला.

आपल्याला शिक्षा सुनावणारा सर्वोच्च न्यायालयाचा ९ मे चा आदेश आणि संबंधित कारवाई याबाबत नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन न झाल्यामुळे हे दोन्ही ‘बेकायदेशीर व निर्थक’ असल्याचे उच्च न्यायालयाने जाहीर करावे, अशी विनंती आपल्या वकिलांमार्फत दाखल केलेल्या याचिकेत कर्णन यांनी केली होती.