ग्रीनपीस संस्थेच्या कार्यकर्त्यां प्रिया पिल्लई यांना लंडनला जाणाऱ्या विमानातून दिल्ली विमानतळावर उतरविण्यात आल्याच्या विरोधात त्यांनी केलेल्या याचिकेवर केंद्र सरकारने आपले म्हणणे सादर करावे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला कळविले आहे.
न्या. राजीव शकधर यांनी गुप्तचर यंत्रणा आणि इमिग्रेशन विभागालाही याबाबत नोटीस पाठविली असून आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. विमानातून उतरविण्याचे कृत्य बेकायदेशीर असून त्यामुळे आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरही गदा येते, असे पिल्लई यांनी याचिकेत म्हटले आहे.
मध्य प्रदेशातील माहन येथे मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याबद्दल ब्रिटनच्या खासदारांसमोर सादरीकरण करण्यासाठी पिल्लई लंडनला जाणार होत्या. आता पिल्लई यांनी ११ फेब्रुवारी रोजी लंडनला जाण्याची परवानगी मागितली असून त्यासाठी अंतरिम अर्ज केला आहे. त्याबाबतही संबंधितांकडून सूचना घ्याव्यात, असे न्यायालयाने प्रतिवादींच्या वकिलांना सांगितले आहे.