नवी दिल्ली : सजा देण्यात आलेला दोषी त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कायदेशीर मदत मिळण्यास पात्र असल्याचे सांगून; दिल्ली सामूहिक बलात्कार व खून प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या चारजणांपैकी पवन गुप्ता याला दिल्लीतील एका न्यायालयाने बुधवारी वकील देऊ केला.

आपण आपल्या पूर्वीच्या वकिलाला हटवले असून, नवा वकील करायला आपल्याला वेळ लागेल असे पवनने सांगितले असता, या विलंबाबाबत न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी नाखुषी व्यक्त केली. जिल्हा न्याय सेवा प्राधिकरणाने पवनच्या वडिलांना निवड करण्यासाठी पॅनेलवरील वकिलांची यादी सोपवली.

पवनने या प्रकरणात अद्याप क्युरेटिव्ह याचिका दाखल केलेली नाही. एखाद्या व्यक्तीला उपलब्ध असलेला हा अखेरचा कायदेशीर उपाय आहे. राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याचा पर्यायही त्याला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर, निर्भयाचे पालक आणि दिल्ली सरकारने चार दोषींच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्याविरुद्ध नव्याने डेथ वॉरंट जारी करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती.

तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी कनिष्ठ न्यायालयासमोर सद्य:स्थिती अहवाल सादर केला. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या सात दिवसांच्या अखेरच्या मुदतीत मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनयकुमार शर्मा आणि अक्षय कुमार या चारही दोषींनी कुठल्याही कायदेशीर मार्गाचा अवलंब केला नसल्याचे त्यात नमूद केले होते.

चारही दोषींच्या फाशीच्या अंमलबजावणीसाठी नवी तारीख निश्चित करावी, ही दिल्ली सरकार व तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी केलेली विनंती कनिष्ठ न्यायालयाने ७ फेब्रुवारीला अमान्य केली होती. या चौघांनी त्यांना उपलब्ध असलेल्या कायदेशीर उपायांचा मार्ग चोखाळण्यासाठी त्यांना एक आठवडय़ाची मुदत देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची त्यांनी दखल घेतली होती.

पीडितेच्या आईची निदर्शने

नवी दिल्ली : आपल्या मुलीच्या सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील चार दोषींना फासावर चढवण्यात विलंब होत असल्याच्या निषेधार्थ पीडितेची आई आशादेवी यांनी बुधवारी कनिष्ठ न्यायालयाबाहेर निदर्शने केली. सजा सुनावण्यात आलेला दोषी त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कायदेशीर मदत मिळण्यास पात्र असतो, असे सांगून न्यायालयाने त्याला वकील देऊ केल्यानंतर हा प्रकार घडला.