दिल्ली उच्च न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी हायअलर्ट जारी केला आहे. आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास पोलिसांना दूरध्वनीवरून धमकी देण्यात आली. न्यायालयाच्या परिसरात बॉम्ब ठेवण्यात आला आहे. तासाभरात न्यायालय बॉम्बने उडवून दिले जाईल, अशी धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, तपासानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी ‘पीटीआय’ला सांगितले.

 

न्यायालयाच्या परिसरात बॉम्ब ठेवण्यात आला असून तासाभरात स्फोट घडवून आणू, अशी धमकी दूरध्वनीवरून मिळाल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी हायअलर्ट जारी केला. त्यानंतर पोलीस, एसडब्ल्यूएटी पथक, अग्निशमन दलाच्या गाड्या, बॉम्बनाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम हाती घेतली. पण न्यायालयीन कामकाज सुरूच होते. दरम्यान, ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. धमकी देणाऱ्याचा मोबाईल फोन बंद आहे. त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.