वंजे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याची मागणी करणारी याचिका शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. वंदे मातरमला अद्यापही राष्ट्रगीताप्रमाणे दर्जा देण्यात आला नाही. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणी दखल घ्यावी, असे या याचिकेत नमूद करण्यात आले होते.

शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळली. वकील अश्निनी उपाध्याय यांनी यासंदर्भातील याचिका दाखल केली होती. सर्व शाळांमध्ये वंदे मातरम राष्ट्रगीताप्रमाणे गायले गेले पाहिजे. तसेच याबाबत एक नॅशनल पॉलिसीदेखील तयार करण्याची मागणी उपाध्याय यांनी केली होती. दरम्यान, मुख्य न्यायाधीश डी.एन पटेल आणि न्यायमूर्ती सी. हरिशंकर यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, काही संघटनांनी वंदे मातरमला विरोधही केला आहे. वंदे मातरममध्ये देशाला माता मानून तिची स्तुती करण्यात आली असल्याचे सांगत याला आपल्या धर्मात याला मान्यता नसल्याचे म्हटले आहे. तसेच कोणावरही याची जबरदस्तीही करता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वंदे मातरम अनिवार्य करता येणार नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता उच्च न्यायालयानेही या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या याच निर्णयाचा दाखला दिला.