14 December 2017

News Flash

महापालिका निवडणुकीसाठी ‘व्हीव्हीपॅट’ वापरण्याची ‘आप’ची मागणी हायकोर्टाने फेटाळली

अखेरच्या क्षणी हे शक्य नसल्याचे कारण सांगत ही याचिका फेटाळली.

नवी दिल्ली | Updated: April 21, 2017 4:54 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल.

दिल्ली महापालिका निवडणुकांसाठी मतदानावेळी इव्हीएमबरोबर व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल) मशीन जोडण्याची मागणी करणारी आम आदमी पक्षाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दि. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅटचा उपयोग व्हावा अशी मागणी आपने केली होती. परंतु, अखेरच्या क्षणी हे शक्य नसल्याचे कारण सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

आम आदमी पक्षाला २३ एप्रिल रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी इव्हीएमऐवजी पावती देणारी व्हीव्हीपॅट मशीन हवी होती. न्या. ए.के. पाठक यांनी व्हीव्हीपॅटचा आदेश या क्षणी देता येत नसल्याचे स्पष्ट केले. या मशीनमधून मतदारांना पावती मिळते. यामध्ये मतदाराने कुणाला मतदान केले, त्याचे चिन्ह या पावतीवर दिसेल. काही वेळानंतर ही पावती तिथे असलेल्या बंद पेटीत पडते.
आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवत असलेले मोहम्मद ताहिर यांनीही याप्रकरणी याचिका दाखल केली होती. निवडणुकीसाठी वापरण्यात येत असलेल्या मशीनमध्ये फेरफार करता येऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे होते. ही याचिका फेटाळण्यापूर्वी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला सुब्रमण्यम स्वामीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुद्यांनुसार व्हीव्हीपीटी इव्हीएमचा पर्याय का निवडला नाही, असा सवाल विचारला. अशा प्रकारची मशीन्स खरेदी केली पाहिजेत, असे न्यायालयाने या वेळी म्हटले. त्याचबरोबर न्यायालयाने आम आदमी पक्षालाही फटकारले. इव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो, असे म्हटले.

First Published on April 21, 2017 4:54 pm

Web Title: delhi high court rejects plea of aap for use evm with vvpat for upcoming mcd poll