देशभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच वैद्यकीय सुविधांचा तुटवडा भासू लागला आहे. राजधानी दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासू लागला आहे. त्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात ऑक्सिजनसोबतच इतर अनेक मुद्द्यांवर सध्या सुनावणी सुरु आहे.

याच दरम्यान रुग्णालयात असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनपासून वंचित ठेवण्यात जात आहे, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. यावर आपण घरीच उपचार घेणाऱ्या करोना रुग्णांना येणाऱ्या समस्यांकडेही लक्ष देत असल्याचं दिल्ली सरकारने सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की अशा परिस्थितीत आपण ऑक्सिजनसाठीचे दोन वेगवेगळे रिफिलर्स लावू शकतो. ज्यापैकी एक रुग्णालयांसाठी असेल तर दुसरा घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी असेल.

त्याबरोबर दिल्ली सरकारनं हे स्पष्ट केलं आहे की आज आम्हाला ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी आम्ही वितरण केंद्रे स्थापन करण्याचाही विचार करत आहोत. अनेक खासगी रुग्णालयांनाही ऑक्सिजनची गरज आहे. अशातच रुग्णालयांसाठी दिलेला ऑक्सिजन तिकडे वळवण्यात येईल.

तर उच्च न्यायालयाने सांगितलं की घरी राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांचा विचार करता रुग्णालयांचा ऑक्सिजन काही काळासाठी कमी करावा लागेल. त्यावर दिल्ली सरकारने स्पष्ट केलं की, हा कठीण काळ आहे. कोणा एकाला ऑक्सिजन हवा असेल तर दुसऱ्याला तो मिळणार नाही.

दिल्लीत बेड्स आणि ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. दिल्लीत सध्या १६८९ ऑक्सिजन बेड्स तर फक्त १४ आयसीयू बेड्स रिकामे आहेत.