नवी दिल्ली : येथील जयपूर गोल्डन रुग्णालयात प्राणवायूच्या कमतरतेमुळे २१ बळी गेल्याच्या प्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करताना दिल्ली पोलिसांचा दृष्टिकोन निष्काळजीपणाचा होता, अशा शब्दात येथील न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. २३-२४ एप्रिलच्या मधल्या रात्री प्राणवायू संपला असताना तो भरत असताना ही दुर्घटना झाली होती. त्यावेळी मृतांपैकी सहा कुटुंबांनी  न्यायालयात धाव घेतली होती. त्यात रुग्णालय व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती त्यावर महानगर दंडाधिकारी विवेक बेनीवाल यांनी सादर केलेल्या स्थितीदर्शक अहवालावर न्यायालयाने टीका केली. हा अहवाल निष्काळजीपणे तयार केला असून तपासी अधिकाऱ्याने हा अहवाल दाखल करताना नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या किंवा कुठले मार्ग अवलंबले हे सांगण्यात आलेले नाही. त्यापुढे न्यायालयाने म्हटले आहे की, पोलीस उपआयुक्तांना स्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची शेवटची संधी दिली जात आहे. त्यानंतर पोलिसांवरच कायदेशीर कारवाई करावी लागेल. रुग्णालय व्यवस्थापनाला या प्रकरणात शिक्षा झाली पाहिजे असे याचिकाकर्त्यांंचे म्हणणे होते, पण पोलिसांचे हेतू मात्र वेगळेचत होते. त्यांनी कुणालाच अटक केली नाही व चौकशीही केली नाही. कुटुंबीयांनी न्यायालयाला अशी विनंती केली की, यात निष्काळजीपणा, फसवणूक, गुन्हेगारी कट व पुरावे नष्ट करणे या आरोपाखाली गुन्हे दाखल करणे व आरोपींना हजर करणे यातले काहीच झालेले नाही.

फिर्यादींचे वकील साहील आहुजा व सिद्धांत सेठी यांनी असे म्हटले आहे की, पुरेसा प्राणवायू नव्हता, तर त्यांनी रुग्णांना दाखलच करून घ्यायला नको होते.