निर्भया सामूहिक बलात्कार, हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या चौघांपैकी दोघांच्या फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी व्हावी, यासाठी सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर रविवारी दुपारी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष सुनावणी होणार आहे. दोषी शिक्षेची अंमलबजावणी लांबणीवर टाकायचे डावपेच खेळून देशाचा संयम पाहात आहेत असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायाधीशांना सांगितले. त्यांनी सरकारच्यावतीने युक्तिवाद केला.

न्यायाधीश सुरेश कैत यांनी तिहार तुरुंग प्रमुखांना नोटीस जारी केली आहे. चारही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या निर्णयाला केंद्राने न्यायालयात आव्हान दिले आहे. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार होती.

मात्र दिल्ली कोर्टाने काल पुढील आदेशापर्यंत फाशीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासंबंधीचे डेथ वॉरंट काढण्यात आले होते. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाल्याचे तिहार तुरुंग प्रशासनाने स्पष्टही केले होते.