व्हॉट्स अॅपवर पत्नीचे दुसऱ्या पुरुषांशी झालेले चॅट वाचून दिल्लीतील एका तरुणाने घटस्फोटासाठी थेट न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्याने पत्नीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करत घटस्फोटासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. तर तरुणाच्या पत्नीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

दिल्लीत राहणाऱ्या तरुणाचे गेल्या वर्षी ७ मे रोजी लग्न झाले होते. हुंडा न घेता आणि गाजावाजा न करता हा विवाहसोहळा पार पडला होता. तरुण हा भागीरथी विहार येथी रहिवासी आहे. तर त्याच्या पत्नीचे माहेर शाहदरा येथील आहे. तरुणाने याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर पती- पत्नीमधील संबंध चांगले नव्हते. पत्नी माझ्यापासून लांब राहायची. तिने माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. माझा पगारही ती स्वतःकडेच ठेवून घ्यायची. माझ्या कुटुंबातील अन्य सदस्यांना मी माझ्या पगारातून काहीच देऊ शकत नव्हतो, असे त्याने याचिकेत म्हटले आहे. माझी पत्नी दररोज रात्री उशिरापर्यंत व्हॉट्स अॅपवर चॅटिंग करायची. एकदा मी पत्नीच्या व्हॉट्स अॅपवरील चॅट वाचले आणि ते वाचून मला धक्काच बसला. ती अनेक तरुणांशी अश्लील चॅट करायची आणि त्यांना अश्लील फोटो देखील पाठवायची, असा गंभीर आरोप तरुणाने केला आहे. पुरावा म्हणून तरुणाने न्यायालयात एक हार्डडिस्कच जमा केली आहे.

मी हा प्रकार पत्नीच्या आई- वडिलांना सांगितला. त्यांनी मला हा प्रकार विसरुन पुढे जाण्याचा सल्ला दिला. मी याला विरोध करताच त्यांनी मला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली, असे तरुणाने याचिकेत म्हटले आहे. पत्नीने तिच्या काही नातेवाईकांना आमच्या घरी बोलावले होते. आम्ही याप्रकरणात पोलिसांकडे तक्रार करताच पत्नीनेही माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरोधात खोटी तक्रार दाखल केली, असे तरुणाचे म्हणणे आहे.

न्यायालयाने या प्रकरणात याचिकाकर्त्याच्या पत्नीला नोटीस बजावत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायालयात त्या महिलेने सर्व आरोप फेटाळून लावले. सध्या न्यायालयाने या दाम्पत्याला समुदेशनासाठी एका समाजसेवी संस्थेकडे पाठवले असून तिथे हा वाद संपुष्टात येईल, अशी आशा व्यक्त होत आहे.