करोनाच्या चौथ्या लाटेचा मुकाबला करणाऱ्या दिल्लीत बुधवारी एका दिवसात १७ हजारांहून अधिक जणांना करोनाची लागण झाल्याने दिल्लीने बाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत मुंबईलाही मागे टाकले आहे. आता दिल्ली हे देशातील सर्वाधिक बाधित शहर बनले आहे.

मुंबईत ४ एप्रिल रोजी सर्वाधिक म्हणजे ११ हजार १६३ जणांना करोनाची लागण झाली होती. बुधवारी बंगळूरुमध्ये आठ हजार १५५ जणांना तर चेन्नईत दोन हजार ५६४ जणांना करोनाची लागण झाली.

दिल्लीत बुधवारी १७ हजार २८२ जणांना करोनाची लागण झाली, तर १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीने दैनंदिन आकडेवारीत मुंबईलाही मागे टाकले आहे.

गेल्या काही दिवसांत इतक्या मोठ्या प्रमाणावर करोनाची लागण झाल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ चक्रावून गेले आहेत. तरुण आणि वृद्ध, लसीकरण झालेले अथवा न झालेले या सर्वांना करोनाचा तडाखा बसत असून दिल्लीतील स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे, असे अपोलो रुग्णालयातील ज्येष्ठ सल्लागार सुरणजित चॅटर्जी यांनी म्हटले आहे.

सप्ताहअखेरीस संचारबंदी

दिल्लीतील करोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सप्ताहाच्या अखेरीस संचारबंदी जारी करण्यासह अनेक निर्बंध घालण्यात येणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. मॉल, व्यायामशाळा, स्पा आणि सभागृहे बंद ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. उपाहारगृहांमध्ये बसून भोजन करण्यावर निर्बंध घालण्यात आले असून चित्रपटगृहांमध्ये एकूण क्षमतेपैकी केवळ ३० टक्केच प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. सप्ताहाच्या अखेरीला संचारबंदी जारी करण्यात येणार आहे त्यादरम्यान अत्यावश्यक सेवा आणि विवाह समारंभांना अनुमती देण्यात आली आहे, मात्र विवाहासाठी जाणाऱ्यांना पास देण्यात येणार आहेत. रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी पाच हजारांहून अधिक खाटा उपलब्ध आहेत.

प्राणवायूचा योग्य वापर करा : केंद्राची राज्यांना सूचना

प्राणवायूचा योग्य पद्धतीने वापर करावा, तो वाया घालवू नये, अशा सूचना गुरुवारी केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आणि देशात प्राणवायूचा पुरेसा साठा असल्याचेही स्पष्ट केले.

वैद्यकीय प्राणवायू हा कोविड-१९ बाधित रुग्णावरील उपचारातील एक महत्त्वाचा घटक आहे. बाधित राज्यांना वैद्यकीय प्राणवायूसह अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मार्च २०२० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या आंतर-मंत्रीय अधिकाऱ्यांच्या सक्षम गटाकडे सोपविण्यात आली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशात गेल्या दोन दिवसांपासून दररोज पूर्ण क्षमतेने प्राणवायूचे उत्पादन करण्यात येत असून सध्याची प्राणवायूची उपलब्धता पुरेशी आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. त्याचप्रमाणे गरजेनुसार जिल्ह््यांना प्राणवायूचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या, सिलिंडरच्या, टँकरच्या गरजेबाबत आढावा घेण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात आल्या आहेत.