X

तरुणीच्या पोस्टमुळे आयुष्य उद्ध्वस्त, ‘विकृत’ शिक्का पुसण्यासाठी तरुणाची धडपड

सोशल मीडियावर तुमची एक पोस्ट दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करु शकते, पोस्ट शेअर करताना थोड जपून

तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर जसलीन कौर या तरुणीने एक पोस्ट टाकली… दिल्लीतील रस्त्यांवर या बुलेटस्वार तरुणाने माझ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप तिने केला…. अरविंद केजरीवाल, सोनाक्षी सिन्हा अशा दिग्गज लोकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले…पण ही एक पोस्ट त्या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त करुन गेली… तक्रारदार तरुणी या प्रकरणाच्या सुनावणीला एकदाही न्यायालयात पोहोचली नाही..मात्र त्या तरुणाला ‘विकृत गुन्हेगार’ हा शिक्का पुसण्यासाठी अजूनही झगडावं लागतंय… या सगळ्या प्रकरणामुळे त्याला नोकरीही गमवावी लागलीये..

सोशल मीडियावर चाललेल्या या ट्रायलचा फटका बसलाय दिल्लीतील सरवजित सिंगला. २८ वर्षांच्या सरवजित सिंगला शहराबाहेर जाण्यापूर्वी दरवेळी पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागते. सरवजितवर ही वेळ ओढावली ती तीन वर्षांपूर्वीच्या एका पोस्टमुळे. ऑगस्ट २०१५ मध्ये जसलीन कौर या तरुणीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये तिने म्हटले होते की, या बुलेटस्वार तरुणाने सिग्नलवर माझ्यासोबत असभ्य वर्तन केले. मला शिवीगाळ केली आणि मला धमकी देखील दिली. या तरुणाचा फोटो आणि दुचाकीचा क्रमांक मी टिळकनगर पोलिसांकडे दिला आहे. मी तक्रार नोंदवली असून ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा, असे तिने म्हटले होते. सिग्नलवर आणखी २० जण होते. पण कोणीही माझ्याबाजूने उभे राहिले नाही. शेवटी मीच पोलिसांकडे तक्रार दाखल केली, असेही तिचे म्हणणे होते.

जसलीन कौरची ही पोस्ट व्हायरल झाली. देशभरातील माध्यमांनी तिची दखल घेतली. अरविंद केजरीवाल, सोनाक्षी सिन्हा आदी मंडळींनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियाने त्याला ‘विकृत’ ठरवले. पोलिसांनीही तक्रारीची दखल घेत सरवजितला अटक केली. अटकेपूर्वी सरवजितने फेसबुकवर त्याची बाजू मांडली होती. ‘जसलीन नामक तरुणीने तिची पोस्ट डिलीट करावी, असे मी म्हणणार नाही. दिल्लीत रस्त्यांवर मुलींची छेड काढली जाते. पण याचा अर्थ असा नाही की जे घडलेच नाही त्यावरुन वाद निर्माण करावा. सिग्नलवरुन मला डाव्या बाजूला जायचे होते. पण त्या तरुणीने मला रोखण्याचा प्रयत्न केला. मी सिग्नल तोडून जात नव्हतो. पण तरीही ती माझ्याशी हुज्जत घालत होती. तिने मला पोलिसांकडे जाण्याची धमकीही दिली होती. आता मी स्वतःच उद्या पोलीस ठाण्यात जाऊन माझी बाजू मांडणार आहे, असे त्याने म्हटले होते.

नोकरी गमावली

‘द प्रिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांच्या कारवाईनंतर सरवजितने नोकरी गमावली. सरवजित हा एका ख्यातनाम कंपनीचे लेबल तयार करायचा. कंपनीचे नाव खराब होत असल्याने उद्यापासून जॉबवर येऊ नको, असे माझ्या बॉसने मला सांगितले, असे सरवजित सांगतो. यानंतर मी एका विवाह मंडळासाठी काम करु लागलो. आधीपेक्षा माझा पगार कमी होता. पण नाईलाजाने मला ही नोकरी स्वीकारावी लागली, असे त्याने सांगितले. सरवजितने कला शाखेत पदवी घेतली असून अॅनिमेशनचा डिप्लोमाही त्याने केला आहे.

काही महिन्यांनी सरवजितला ती नोकरीही सोडावी लागली. नोव्हेंबर २०१६ मध्ये त्याला तिसरी नोकरी मिळाली. मात्र, सुनावणीसाठी कोर्टात हजेरी लावावी लागत असल्याने सरवजितला रजा घ्यावी लागायची. यामुळे त्याला तिथूनही कामावरुन काढून टाकण्यात आले. दोषमुक्त झाल्यानंतरच आता कामावर ये, असे तेथील वरिष्ठांनी मला सांगितल्याचे सरवजित सांगतो.

सुनावणीला सुरुवातच नाही

गेल्या तीन वर्षांपासून सरवजित न्यायालयाच्या फेऱ्या मारतोय. तक्रारदार जसलीन कौर एकाही सुनावणीला न्यायालयात आलेली नाही. तिचे वडील तीन वेळा आले. त्यांनी मुलगी शिक्षणासाठी कॅनडात असल्याचे न्यायालयात सांगितले. तर दुसरीकडे सरवजितला सध्या आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो. चांगल्या वकिलांची फी जास्त असते. सध्या सरवजित सुनावणीनुसार वकिलाला मानधन देतो. तो वकिलही न्यायालयात सरवजितची बाजू मांडत नाही. शेवटी गेल्या सुनावणीत सरवजितनेच न्यायालयाला या प्रकरणावर निकाल द्यावा, अशी विनंती केली. अखेर न्यायालयाने आता कठोर भूमिका घेतली आहे. ‘डिसेंबरमध्ये होणाऱ्या सुनावणीत तक्रारदार तरुणी न्यायालयात हजर झाली नाही तर तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले जाईल, असा इशाराच न्यायालयाने दिला आहे. आता डिसेंबरमध्ये हे प्रकरण निकाली निघेल, अशी आशा त्याने व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणावर जसलीन, तिचे वडील किंवा तिच्या वकिलांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘टाइम्स नाऊ’च्या माजी कर्मचाऱ्याने मागितली माफी

सरवजितची ही व्यथा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या बातमीनंतर त्याकाळी टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या माजी पत्रकाराने सरवजितची माफी मागितली आहे. फेसबुक मेसेंजरवरुन त्याने सरवजितला मेसेज केला. सोशल मीडियावरील एका पोस्टवरुन मी त्यावेळी बातमी करत होतो. पण आज मला माझ्या वार्तांकनाची लाज वाटते. माझ्या माफीने तुझे नुकसान भरुन निघणार नाही. पण तरीही तू मला माफ करशील अशी आशा आहे, असा मेसेज त्या माजी पत्रकाराने सरवजितला पाठवला.