दिल्लीतील महानगर न्यायदंडाधिकारी सकाळी न्यायालयात कामकाजात व्यस्त होते, याच दरम्यान त्यांना फोन आला…मात्र हा फोन होता शेजारच्यांचा आणि तुमच्या घरात चोरी झाल्याचे शेजारच्यांनी सांगितले. या घटनेने दिल्ली पोलिसांची नाचक्की झाली.

दिल्लीतील महानगर न्यायदंडाधिकारी हे गुलाबी बाग परिसरातील इमारतीमध्ये राहतात. ९ ऑगस्टरोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास न्यायाधीश न्यायालयात कामकाजात व्यस्त होते. यादरम्यान त्यांना फोन आला. फोन त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी केला होता आणि तुमच्या घरात चोरी झाली आहे, असे त्यांनी फोनवर सांगितले. शेवटी न्यायाधीशांनी घरकाम करणाऱ्याला घरी जाऊन परिस्थितीची पाहणी करायला सांगितले. पोलिसांकडे फिर्यादही त्यानेच दिली आहे. यात त्याने म्हटले आहे की, न्यायदंडाधिकाऱ्यांनी मला त्यांच्या घरी जाऊन पाहणी करायला सांगितले. मोबाईल फोन, घड्याळ आणि लॅपटॉप घरात आहे का, हे त्यांनी तपासायला सांगितले होते. मी घरात गेलो असता दरवाज्यावरील लॉक तोडलेला होता. मला कपाटात लॅपटॉप सापडला. पण मोबाईल फोन आणि घड्याळ चोरीला गेले होते. घरातील अन्य वस्तूही खाली पडलेल्या होत्या, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे.

न्यायाधीशांच्या घरी दिवसाढवळ्या चोरी झाल्याने पोलिसांची नाचक्की झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरुवात केली आहे. दिल्लीत न्यायाधीशांच्या घरी चोरी झाल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी अतिरिक्त जिल्हा सत्रन्यायाधीशांच्या घरातही मार्च महिन्यात चोरी झाल्याची घटना घडली होती.