उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे मध्यरात्री उशिरा तुंडला स्थानकावर कालिंदी एक्स्प्रेस व मालगाडीत टक्कर झाली. परंतु, मोठा अपघात टळला. सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. परंतु एक्स्प्रेसचे तीन डबे रूळावरून घसरले. यात एक्स्प्रेसच्या इंजिनसह जनरल बोगीचे मोठे नुकसान झाले. या अपघातात तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांत कानपूरजवळ झालेली रेल्वेची ही तिसरी दुर्घटना ठरली आहे.

१४७२३ कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेस तुंडला स्टेशनवर रात्री दोनच्या सुमारास पोहोचल्यानंतर हा अपघात झाला. रेल्वेचा वेग कमी असल्यामुळे जीवितहानी झाली नाही. परंतु, रात्री उशिरापर्यंत प्रवाशांना कोणतीही मदत न मिळाल्यामुळे ते चांगलेच भडकले होते. त्यांनी रेल्वेविरोधात घोषणाही दिल्या. काही रेल्वे प्रवाशांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना टॅग करून टविट करूनही मदत न मिळाल्याचा आरोप केला.
तुंडला रेल्वे स्थानकावर कालिंदी एक्स्प्रेस ओव्हरशूट झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. रेल्वे प्रशासनाने दिल्ली-हावडा रेल्वेचा मार्ग बदलला आहे. दरम्यान पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी कालिंदी एक्स्प्रेस आग्राकडे रवाना करण्यात आली.