लखनौ-दिल्ली तेजस एक्स्प्रेस या देशातील पहिल्या ‘खासगी रेल्वेला’ जर एक तासाहून अधिक विलंब झाला तर प्रवाशांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) ऑक्टोबर महिन्यापासून तेजस ट्रेन सुरू होणार आहे. ही रेल्वे जर तासभर उशिरा आली तर प्रवाशांना त्याची काही भरपाई (पेआऊट्स) देण्याचा विचार आयआरसीटीसी करीत आहे.

भारतीय रेल्वे आता आपल्या सेवेचा चेहरा बदलण्याच्या प्रयत्नात आहे. यानुसार दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस आणि मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस या रेल्वेंना खासगी स्वरूपात चालवले जाणार आहे. या गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुखसोयी व आरामदायी व्यवस्था असतील. पहिली ट्रेन दिल्ली ते लखनौ दरम्यान धावणार आहे. तेजस एक्स्प्रेसचं भाडं याच मार्गावरून धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसएवढंच असेल, पण यात अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. दुसरी तेजस नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे.

याशिवाय दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेसमध्ये जास्तीचे जेवण देण्याचाही विचार आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, पण ही रेल्वे लखनौत पोहोचते तेव्हा दुसऱ्यांदा जेवणाची वेळ झालेली असते. त्यामुळे स्टेशनवर रेल्वे आल्यानंतर स्नॅक किंवा अन्य काही वितरित करण्याच्या विचारात आहोत असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. तसंच, तेजस एक्स्प्रेसमध्ये चहा/कॉफीच्या व्हेंडिंग मशीन्स, प्रवाशांनी मागणी केल्यास पाण्याव्यतिरिक्त (बेव्हरिजेस) पेय, विमानात असतात तशा टॉयलेटची सेवा अर्थात प्रत्येक डब्यात फक्त दोनच टॉयलेट, ज्येष्ठ नागरिकांसाठी भाड्यात सवलत, तिकीटासोबत 50 लाख रुपयांचं इन्श्युरन्स कव्हर अशा सेवा सुरू करण्याचा आयआरसीटीसीचा विचार आहे.