दिल्लीमधील एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून करुन तिचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मृतदेह थेट उत्तराखंडमधील मसुरीला घेऊन जाण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात संबंधित आरोपी पतीबरोबरच त्याच्या संपूर्ण कुटुंबालाच अटक केली आहे.

दिल्लीतील हर्ष विहार परिसरातील या घटनेच्या चौकशीदरम्यान पोलिसही चक्रावले आहेत. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार ११ डिसेंबर रोजी ललित जैन नावाच्या प्रॉपर्टी डिलरने रानी बाग पोलिस स्थानकामध्ये पत्नी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मागील काही दिवसांपासून आपली पत्नी बेपत्ता असल्याचे सांगतिले. पोलिसांनी ललितची रितसर तक्रार नोंदवून घेत त्याची पत्नी सिल्कीचा शोध सुरु केला. सुरुवातीलाच पोलिसांनी ललितची कसून चौकशी केली तेव्हाच त्याने तिची हत्या आपणच केल्याची कबुली दिली. ललितने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानेच तिचा गळा दाबला आणि नंतर डोक्यात हतोडीने वार करुन तिची हत्या केली. हत्येनंतर ललित आणि त्याच्या कुटुंबियांनी सिल्कीची रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह व्यवस्थित एका गोणीत गुंडाळला. नंतर त्यांनी तो मृतदेह ३०० किलोमीटर लांब असणाऱ्या मसुरीला नेऊन नाल्यामध्ये फेकून दिला.  ललितने तक्रार नोंदवल्यानंतर सिल्कीच्या नातेवाईकांनी ललित कायम तिच्याबरोबर भांडत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतरच पोलिसांना त्याच्यावर संक्षय आला.

सिल्कीच्या नातेवाईकांनीच जैन कुटुंबियांनी आपल्या मुलीची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतरच पोलिसांनी या आरोपांच्या आधारे तपास सुरु केला. ललितने सिल्कीच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार ललितला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर ललितने लगेच गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी ललितने दिलेल्या माहितीच्या आधारे मसुरीमधून सिल्कीचा मृतदेह शोधून ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नाल्यात वाहून गेलेला मृतदेह शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांना इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांची मदत घ्यावी लागली. या प्रकरणात खून आणि खुनासाठी मदत करण्याच्या आरोपाखाली पोलिसांना ललित आणि त्याची बहिण, मेहुणा, वडील यांना अटक केली असून ते या चौघांचीही कसून चौकशी करत आहेत.