21 January 2019

News Flash

एम्स रूग्णालयात पाच महिने डॉक्टर म्हणून वावरणारा तरूण अटकेत

गेल्या पाच महिन्यांपासून एम्स रूग्णालयात डॉक्टर असल्याचे भासवत वावरणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आली आहे. अदनान खुर्रम असे या तरूणाचे नाव आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

गेल्या पाच महिन्यांपासून एम्स रूग्णालयात डॉक्टर असल्याचे भासवत वावरणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आली आहे. अदनान खुर्रम असे या तरूणाचे नाव आहे. दिल्लीच्या एम्स या प्रसिद्ध रूग्णालयात अदनान डॉक्टरच्या वेशात फिरत होता. आपले मित्र वाढवण्यासाठी आपण तोतया डॉक्टर म्हणून वावरत होतो अशी कबुली अदनानने दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली त्यानंतर त्याला असलेले औषधांचे ज्ञान ऐकून पोलीसही चकित झाले. एवढेच नाही तर एम्समधील डॉक्टरांची नावे, त्यांचे विभाग, विभागप्रमुखांची नावेही या तरूणाला तोंडपाठ आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून एक डायरीही जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अदनानने अजून हेदेखील स्पष्ट केलेले नाही. अटक करण्यात आल्यापासून तो त्याची वक्तव्ये बदलतो आहे. त्यामुळे तो नक्की डॉक्टर म्हणून एम्स रूग्णालयात का वावरत होता हे स्पष्ट झालेले नाही. अदानान प्रत्येक वेळच्या चौकशीत वेगवेगळे बोलतो आहे. त्याने आपण पदवीधारक विद्यार्थी नाही आपण वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतो आहे असेही काहीजणांना सांगितले आहे असेही पोलिसांनी म्हटले आहे. त्याने आपल्या मोबाइलमध्ये विविध प्रकारचे व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केले आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. पोलिसांन अदनान खुर्रम विरोधात कलम ४१९, आणि ४६८ अन्वये गुन्हे नोंदवले आहे.

एम्स रूग्णालयात २ हजार निवासी डॉक्टर आहेत त्यामुळे प्रत्येक डॉक्टर पर्यंत पोहचणे काही वेळा कठीण असते. याच गोष्टीचा गैरफायदा घेत अदनान खुर्रम या डॉक्टरांमध्ये मिसळला आणि डॉक्टर असल्याचे भासवून त्याने फसवणूक केली असेही पोलिसांनी म्हटले आहे. शनिवारी एम्स रूग्णालयात निवासी डॉक्टरांची मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अदनानही त्यात सहभागी होण्यासाठी आला. तो आला असता काही डॉक्टरांना त्याच्यावर संशय आला. ज्यानंतर अदनानकडे ओळखपत्र विचारण्यात आले. तेव्हा त्याने काही समाधानकारक उत्तर दिले नाही. मग पोलिसांना बोलवण्यात आले आणि खुर्रमला अटक झाली.

अदनान खुर्रमने डॉक्टरांच्या वेशात अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. त्याने काही फोटो राजकारण्यासोबतही पोस्ट केले आहे. अदनान खुर्रम हा मूळचा बिहारचा राहणारा आहे

First Published on April 16, 2018 4:01 pm

Web Title: delhi man pretends to be doctor in aiims for 5 months arrested by police