वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना १ सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागत आहे. देशभरात सध्या याच नियमांची आणि त्यानुसार सुरु झालेल्या दंडाची चर्चा आहे. असे असतानाच आता दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील एका व्यक्तीला पोलिसांनी नव्या नियमांनुसार दंड केला. यामुळे संतापलेल्या दुचाकीस्वाराने स्वत:च्या बाईकलाच आग लावली. दिल्लीतील शेख सराई परिसरात बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.

स्वत:च्याच बाईकला आग लावणारा हा इसम दारुच्या नशेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी या इसमाला थांबवले. पोलिसांनी त्याला गाडीचे कागदपत्र दाखवण्यास सांगितले. त्यावेळी गाडीची कागदपत्रे दाखवतो असं पोलिसांना सांगत गाडीवरुन हा इसम खाली उतरला आणि त्याने गाडीच पेटवून दिली.

घडलेला प्रकार पाहून पोलीस हवलदारही गोंधळले. त्यांनी लगेच अग्निशामन दलाला फोन आगीची माहिती दिली. अग्निशामन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आग विझवली. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. मात्र या व्यक्तीचे नाव काय होते याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

दिल्लीमध्ये नवीन नियमांनुसार रविवारी एकाच दिवसात ३ हजार ९०० जणांना दंड ठोठावला आहे. देशभरामध्ये नवीन वाहतूक नियमांची चर्चा असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे म्हणून १ सप्टेंबरपासून बदललेल्या वाहतूक नियमांनुसार दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख लोकांना प्राण गमवावे लागतात. अपघातांमध्ये दगावणाऱ्यांत तरुणांची संख्या सर्वाधिक असून हे प्रमाण एकूण अपघात मृत्यूंच्या ६५ टक्के आहे. हे लक्षात घेत वाहनधारकांवर वचक बसवण्यासाठी नियम अधिक कडक करून वाहतुकीला शिस्त लावणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे, यासाठी नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक खात्याने जुन्या कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक गेल्या लोकसभेतच मांडले होते. त्याला १७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात मंजुरी मिळाली. नवीन नियमांनुसार परवाना नसताना वाहन चालवल्यास होणारा दंड ५०० रुपयांवरून ५ हजार रुपये केला गेला आहे. मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालवल्यास आता ४०० रुपयांऐवजी २ हजार रुपये दंड आकारला जाईल. कायमस्वरूपी चालक परवाना मिळवण्याची प्रक्रियाही अधिक कडक करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून न दिल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.