राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचले आहेत. दिल्लीत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले असून यावेळी त्यांच्यात चर्चा सुरु आहे. गेल्या एक तासापासून मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा सुरु असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाणदेखील उपस्थित आहेत.

शरद पवार-उद्धव ठाकरे भेटीत काय चर्चा झाली?; संजय राऊतांनी दिली माहिती

नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ७ वाजता मुंबईतून निघाले होते. दिल्लीत दाखल झाल्यानंतर मोदींच्या शासकीय निवासस्थानी सकाळी ११ वाजता त्यांच्यात बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साडे अकराच्या सुमारास पत्रकार परिषद घेतील असं बोललं जात होतं. मात्र एक तासाहून अधिक काळ सुरु असलेल्या या बैठकीत काय चर्चा सुरु आहे याची आता उत्सुकता लागली आहे.

मोदी-उद्धव ठाकरे भेट : सोमवारी रात्री उशिरापर्यंत ‘वर्षा’वर सुरु होती पवारांसोबत चर्चा

मोदींसोबतच्या भेटीदरम्यान मराठा आरक्षण, तौक्ते चक्रीवादळ नुकसानभरपाई, जीएसटी भऱपाई थकबाकी अशा अनेक विषयांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदींशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या बैठकीला जाण्यापूर्वी सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर सोमवारी रात्री उशीरापर्यंत ही बैठक सुरु होती.

दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उद्धव ठाकरे मोदींची भेट घेणार असल्याची माहिती देताना मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि तौते चक्रीवादळ मदतीसंदर्भात चर्चा केली जाईल अशी माहिती दिली होती.