News Flash

“मला आज रडू येतंय, आमदार असल्याची लाज वाटते”, दिल्लीतील ‘आप’च्या आमदाराचा व्हिडिओ व्हायरल!

आपच्याच आमदाराने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरचा आहेर दिला आहे!

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये करोना दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करू लागला आहे. त्यातच दिल्लीच्या अनेक रुग्णालयांकडून ऑक्सिजनचा अपुरा साठा असल्याची तक्रार केली जात आहे. दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी देखील सुरू आहे. मात्र, या सगळ्यामध्ये दिल्लीतल्या परिस्थितीमध्ये फारसा फरक पडत नसल्याचे आरोप होत आहेत. यासंदर्भात दिल्ली सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत असताना आता दिल्लीत ज्या पक्षाचं सरकार आहे, त्या आम आदमी पार्टी अर्थात AAP च्याच एका आमदाराने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरचा आहेर दिला आहे. दिल्लीतील माटिया महल विधानसभा मतदारसंघातील आपचे आमदार शोएब इकबाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. काँग्रेससोबतच भाजपाच्याही अनेक ट्विटर हँडल्सवरून हा व्हिडिओ ट्वीट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये शोएब इकबाल यांनी भावनिक होऊन दिल्लीतली परिस्थिती विषद केली आहे.

पैसा आहे, पण ऑक्सिजन मिळत नाहीये!

शोएब इकबाल यांनी व्हिडिओमध्ये दिल्लीमधील करोनाच्या परिस्थितीवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “आज मला दिल्लीची परिस्थिती पाहून रडू येत आहे. रात्रभर मला झोप येत नाहीये. लोकांना दिल्लीत ऑक्सिजन मिळत नाहीये, औषधं मिळत नाहीयेत. माझा मित्र यावेळी दिल्लीच्या न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात तडफडतो आहे. त्याच्याजवळ ना ऑक्सिजन आहे ना व्हेंटिलेटर आहे. रात्रीपासून माझ्याकडे औषधांची चिठ्ठी आहे. मी त्याला कुठून रेमडेसिविर आणून देऊ? देव करो आणि त्याचं काही बरं-वाईट न होवो. मुली रडत आहेत. सगळं आहे, पैसा आहे पण त्याला औषधं मिळत नाहीयेत. ऑक्सिजन मिळत नाहीये”, असं शोएब इकबाल या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

“…तर दिल्लीच्या रस्त्यांवर प्रेतं दिसतील!”

या व्हिडिओमध्ये आमदार शोएब इकबाल यांनी दिल्ली सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. “मला आज आमदार असण्याची लाज वाटत आहे. आम्ही कुणाच्या मदतीला उपयोगी पडू शकत नाहीयेत. सरकार मदत करू शकत नाहीये. मी ६ टर्म आमदार आहे. दिल्लीतला सगळ्यात ज्येष्ठ एकच आमदार आहे. पण त्यानंतरही कुणी ऐकणारं नाही. कुणाला संपर्क करायचा? कोण नोडल अधिकारी आहे कळत नाहीये. त्यामुळे माझी विनंती आहे की दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करावी. दिल्लीत फार गंभीर परिस्थिती आहे. असं झालं नाही तर रस्त्यांवर प्रेतं दिसू लागतील”, असं शोएब इकबाल यांनी म्हटलं आहे.

लसींचा १०० टक्के साठा केंद्र सरकारच का विकत घेत नाही?; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

दरम्यान, शोएब इकबाल यांच्या या व्हिडिओनंतर भाजपा आणि काँग्रेसकडून दिल्ली सरकारवर टीका केली जाऊ लागली आहे. गोवा काँग्रेसनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ ट्वीट करत दिल्ली सरकारवर निशाणा साधला आहे.

 

तर दिल्लीतील भाजपा आमदार अजय महावार यांनी देखील या ट्वीटवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या व्हिडिओनंतर अरविंद केजरीवाल यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. “आंदोलन जीवींसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अवघ्या काही तासांमध्ये वायफाय, वीजपुरवठा उपलब्ध करून देऊ शकतात, तर मग आप आमदार शोएब इकबाल यांना आपल्याच मुख्यमंत्र्यांवर करोना परिस्थिती हाताळण्याबाबत विश्वास कसा नाही?” असा सवाल त्यांनी केला आहे.

 

या सगळ्या प्रकारानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकारवर टीका करण्यासाठी विरोधकांना नवा मुद्दा मिळाल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 5:01 pm

Web Title: delhi mla shoaib iqbal video on corona situation demands presidents rule in delhi pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: विमा कंपन्यांना क्लेम एका तासात मंजूर करण्याचे आदेश
2 लसींचा १०० टक्के साठा केंद्र सरकारच का विकत घेत नाही?; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
3 खबरदार! सोशल मीडियावरून मदत मागणाऱ्यांवर कारवाई कराल तर; सर्वोच्च न्यायालय संतापले
Just Now!
X