दिल्लीतील सरवजित सिंग या तरुणाविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या पण गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयात सुनावणीला गैरहजर राहणाऱ्या जसलीन कौरने अखेर मौन सो़डले आहे. मी सध्या कॅनडात नोकरी करत असून मी योग्य वेळी न्यायालयात उपस्थित राहणार, मी माझ्या आरोपांवर ठाम आहे, असे तिने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर दिल्लीत राहणाऱ्या जसलीन कौर या तरुणीने एक पोस्ट टाकली होती. यात तिने म्हटले होते की, दिल्लीतील रस्त्यांवर या बुलेटस्वार तरुणाने माझ्यासोबत असभ्य वर्तन केले. मला शिवीगाळ केली. या प्रकरणी तिने टिळकनगर पोलिसांकडे गुन्हा देखील दाखल केला होता. पोलिसांनी पोस्टमधील बुलेटस्वार तरुणाला शोधून त्याला अटक केली. सरवजित सिंग असे त्या तरुणाचे नाव आहे. गेल्या तीन वर्षांपासून जसलीन एकाही सुनावणीला न्यायालयात आलेली नाही. तर दुसरीकडे जसलीनच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर ‘विकृत’ ठरवलेल्या सरवजितला गुन्हेगाराचा शिक्का पुसण्यासाठी धडपड करावी लागत आहे. या प्रकरणामुळे त्याला नोकरी देखील गमवावी लागली.

वाचा: तरुणीच्या पोस्टमुळे आयुष्य उद्ध्वस्त, ‘विकृत’ शिक्का पुसण्यासाठी तरुणाची धडपड

सरवजितचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जसलीन कौरने प्रतिक्रिया दिली आहे. जसलीन सध्या कॅनडात एका कंपनीच्या एचआर विभागात काम करत आहे. जसलीन म्हणाली, मी माझ्या आरोपांवर ठाम आहे. मी सुनावणीपासून पळ काढलेला नाही. मी स्वत:च हा लढा सुरु केला असून मी न्यायालयासमोर माझी बाजू मांडणार, असे तिने स्पष्ट केले आहे.

जसलीनविरोधात न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले होते, असा दावा सरवजितने केला आहे. यावरही जसलीनने स्पष्टीकरण दिले. माझ्याविरोधात कोणत्याही न्यायालयाने जामीनपात्र किंवा अजामीनपात्र वॉरंट जारी केलेले नाही, असे तिने म्हटले आहे. मी या प्रकरणावर मौन बाळगले. पण काहींनी त्याचा चुकीचा अर्थ काढला, असेही जसलीनने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi molestation case against sarvjeet singh jasleen kaur breaks silence
First published on: 12-09-2018 at 10:09 IST