भारत सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी गाझीपूर सीमेजवळ राष्ट्रीय महामार्गावर खिळे ठोकल्याचे वृत्त मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता याचसंदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसेनंतर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अनेक पद्धतीची नाकाबंदी केल्याचे पहायला मिळालं. यामध्ये अगदी बॅरिकेट्सपासून ते लोखंडी खांब, सिमेंट काँक्रीटच्या भिंती आणि लोखंडी खिळ्यांच्या पट्ट्यांचा वापर करुन दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमा बंद केल्यात. मात्र गुरुवारी शेतकरी आंदोलकांनी या सीमांवर पोलिसांनी लावलेली खिळे वाकवल्याचे वृत्त समोर येत आहे.

गाझीपूर सीमेजवळ शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करु नये म्हणून नाकाबंदी करण्यात आलीय. या ठिकाणी बॅरिकेट्सबरोबरच मोठ्या आकाराचे खिळे काँक्रीटच्या मदतीने उलटे लावण्यात आले आहेत. कोणी या ठिकाणांहून वाहने किंवा पायी जाण्याचा प्रयत्न केला तर हे खिळे घातक ठरु शकतात. त्यामुळेच शेतकऱ्यांनी या ठिकाणी लावण्यात आलेले खिळे वाकवले आहेत. बुधवारी रात्रीच्या सुमारास हे खिळे वाकवल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र हे काम नक्की कोणी केलं यासंदर्भातील माहिती मिळालेली नाही. तसेच हे वाकलेले खिळे पाहून सकाळी अनेक शेतकऱ्यांनी हे खिळे काढण्यास सुरुवात केल्याचं चित्रही या ठिकाणी दिसून आलं. एएनआयने यासंदर्भातील काही फोटोही ट्विट केले आहेत.

सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमांवर दिल्ली पोलिसांनी सिमेंट काँक्रीटची भिंत उभारली असून, काँक्रीटमध्ये रुतलेल्या मोठय़ा खिळ्यांचे तीन-चार पदरी अडथळे तयार केले आहेत. तारेची कुंपणेही उभारण्यात आली आहेत. पोलीस आणि निमलष्करी जवानांनीही आंदोलनस्थळांभोवती किमान चारस्तरीय कडे केले असल्याने आंदोलक शेतकऱ्यांची पूर्ण नाकाबंदी झाली आहे.

पोलिसांकडून समर्थन

सुरक्षा भिंत, तारांचे कुंपण उभारण्याच्या निर्णयाचे दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी समर्थन केले. २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी अडथळे तोडून दिल्लीत प्रवेश केला होता. सुरक्षेसाठी पोलिसांनी हेच अडथळे आता अधिक भक्कम केले आहेत, असे श्रीवास्तव म्हणालं आहे.