नवी दिल्लीतील शालीमार बाग परिसरातील मॅक्स रुग्णालयामधील डॉक्टरांता निष्काळजीपणा समोर आहे. या रूग्णालयाने एका जिवंत नवजात बालकाला मृत घोषित करून नातेवाईकांकडे सोपवून दिले. मात्र सीलबंद पाकिटात बाळाची हालचाल दिसली. ज्यामुळे हा सगळा प्रकार उघड झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी मॅक्स रुग्णालयात एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. या मुलांमध्ये एक मुलगा आणि एका मुलीचा समावेश होता. यापैकी एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितले. यामुळे कुटुंबीय धक्क्यामध्ये असताना डॉक्टरांनी दुसरे बाळही मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकारामुळे कुटुंबीय दु:खात बुडाले. यानंतर डॉक्टरांनी दोन्ही बालकांचे देह त्यांच्या कुटुंबांकडे सोपवून दिले. मात्र, हे कुटुंब रुग्णालयातून बाहेर पडून पुढील चौकातच पोहोचले तोच यांपैकी मुलगा असलेल्या बालकाने श्वास घेण्यास सुरुवात केली. तसेच सीलबंद पाकिटात पायांची जारदार हालचाल केली.


या प्रकाराने आश्चर्यचकित झालेल्या नातेवाईकांनी ताबडतोब या मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी या मुलाची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. मात्र, दुसऱ्या बालकाला मृत घोषित केले. यानंतर या कुटुंबाने मॅक्स रुग्णालयात जाऊन मोठा गोंधळ घातला. पोलिसांना याची सूचना देत शालीमार बाग पोलिस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकरणी त्यांनी तक्रारही नोंदवली. दरम्यान, आई आणि मुलावर दुसऱ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, हा प्रकार केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच डॉक्टरांचा हा निष्काळजीपणाचा प्रकार खूपच निंदनीय असून दिल्ली सरकारने या प्रकरणी योग्य कारवाई करावी असे आदेश नड्डा यांनी दिले आहेत.