आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेची तिच्या चौथ्या पतीने गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. मयत गर्भवती महिलेचं नाव सायना (वय २९) असून, दिल्लीत ती ड्रग्जची (ड्रग्ज डिलर) विक्री करायची. त्यामुळे तिला ड्रग्ज क्विन म्हणूनही ओळखल जात होतं. या घटनेत तिचा पती वसीम जखमी झाला असून, गोळ्या झाडतानाचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

दिल्लीतील हजरत निजामुद्दीन भागात सकाळी १०:३० वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र, पोलीस पोहोचेपर्यंत गर्भवती सायना हिचा मृत्यू झाला होता. तर तिचा नोकर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही सगळी घटना जवळच्या सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली. दृश्यांमध्ये चौथा पती वसीमने सायनावर अनेक फैरी झाडल्याचं दिसत आहे. यावेळी तिच्या मदतीला आलेल्यावरही वसीमने गोळी झाडल्याचं दिसत आहे.

आठवा महिना… तुरूंगातून सुटली… नेमकं घडलं काय?

एका वर्षापूर्वी सायनाने चौथा पती वसीमसोबत विवाह केला होता. लग्न झाल्यानंतर तिला ड्रग्ज विक्री प्रकरणात अटक झाली. काही दिवसांपूर्वीच तिला आठ महिन्यांची गर्भवती आणि गर्भात जुळी मुलं असल्यानं जामीन मिळाला होता. तिच्या पहिल्या दोन्ही पतींनी तिला सोडलेलं आणि बांगलादेशात गेले. त्यानंतर तिने ड्रग्ज डिलर असलेल्या शराफत शेख याच्यासोबत लग्न केलं. त्याला दिल्ली-एनसीआरमध्ये ड्रग्ज लॉर्ड म्हणून ओळखलं जातं. शेखला एनडीपी कायद्याखाली अटक करण्यात आली होती. शेखनंतर तिने वसीमसोबत लग्न केलं.

सायनाला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर वसीमने तिची बहिणी रिहाना हिच्यासोबतच विवाहबाह्य संबंध प्रस्थापित केले. जेव्हा सायना जामीनावर सुटली, त्यानंतर वसीमला रिहानासोबत संबंध ठेवण्यात अडसर येऊ लागला. त्यावरून दोघांमध्ये वाद होत होते. रिहानासोबतचे संबंध कायम ठेवण्यासाठी वसीमने सायनाला संपवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सायनाची हत्या करण्याच्या उद्देशाने त्याने दोन पिस्तुल सोबत आणले. सायनाच्या घरी आल्यानंतर त्याने तिच्यावर गोळ्या झाडल्या. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या तिच्या नोकरावरही वसीमने गोळीबार केला. यात सायनाच जागीच मृत्यू झाला. तर नोकर जखमी झाला. त्यानंतर वसीमने स्वतः निजामुद्दीन पोलीस ठाण्यात स्वतःला स्वाधीन केलं. या प्रकरणामागे रिहानाचा हात आहे का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.