दिल्लीमधील शाहदरा जिल्ह्यामध्ये एसीवरुन झालेल्या वादातून एका वयस्कर व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एसीमधून गरम हवा निघत असल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एका वयस्कर व्यक्तीला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन धक्का देण्यात आला. यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना फर्श बाजार येथील एनएसए कॉलिनीमध्ये मंगळवारी दुपारी घडली.

मृत व्यक्ती ही आपल्या कुटुंबाबरोबर राहत होती. मंगळवारी दुपारी एसीमधून गरम हवा निघत असल्याच्या मुद्द्यावर वाद झाला. या वादाचे रुपांतर बाचाबाजीत झाले आणि त्यामधुनच या वयस्कवर व्यक्तीला शेजऱ्याने धक्का दिला. या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी २ वाजू ४२ मिनिटांनी पोलीस स्थानकामध्ये रुग्णालयामधून फोन आला. जखमी अवस्थेमध्ये एका व्यक्तीला रुग्णालयात आणल्याची माहिती फोनवर पोलिसांना देण्यात आली. शेजाऱ्यांबरोबर झालेल्या वादातून या वयस्कर व्यक्तीला इमारतीवरुन धक्का देण्यात आला. या वयस्कर व्यक्तीला रुग्णालयात आणण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव धर्मपाल असं आहे. धर्मपाल ६० वर्षांचे होते. धर्मपाल हे आपल्या कुटुंबाबरोबर मागील अनेक वर्षांपासून राहत होते. शेजरी राहणाऱ्या धर्मेंद्रबरोबर एसीमधून निघणाऱ्या गरम हवेच्या मुद्द्यावरुन वाद झाला आणि त्याच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

दोघांच्या घरचे एसी बाजूबाजूलाच होते. त्यामुळे एका घरचा एसी लावल्यानंतर दुसऱ्या घरामध्ये गरम हवा जात होती. यावरुनच दोघांमध्ये मोठा वाद झाला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये धर्मेंद्रला अटक केली आहे. धर्मेंद्रच्या इतर नातेवाईंकांचे पोलीस शोध घेत आहेत, असं न्यू १८ हिंदीने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.