टिकटॉक सेलिब्रेटी मोहित मोर याच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. २१ मे २०१९ रोजी दिल्लीत गोळ्या घालून मोहित मोरची हत्या करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करत शूटर विकास उर्फ पीके आणि रोहित डागर यांना नजफगड येथून अटक केली. दोघेही कपिल सांगवान टोळीचे शार्प शूटर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

विकास आणि रोहित यांनी संदीप पेहलवान या गुन्हेगाराने हत्येची सुपारी दिली होती. दिल्ली पोलिसांनी विकासच्या अटकेसाठी १ लाख २० हजारांचं आणि रोहितवर २५ हजारांचं बक्षिस जाहीर केलं होतं. अटक केल्यानंतर काही वेळातच विकास याने सोसळ मीडियावर एक व्हिडीओ अपलोड करत आपल्या समर्थकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.

डीसीपी (विशेष पथक) संजीव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास आणि रोहित हत्या, खंडणी, चोरी अशा अनेक गुन्ह्यांमध्ये फरार होते. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेश अशा अनेक ठिकाणी त्यांनी गुन्हे केले होते. पोलिसांनी सांगवान गँगमधील सर्वांवर मोक्का लावला होता.

“आम्हाला दोन्ही आरोपी जिरकपूर येथे लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आमच्या टीमने पाठलाग करुन त्यांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत,” अशी माहिती संजीव यादव यांनी दिली आहे.

विकास आणि रोहित यांनी २०१९ मध्ये टिकटॉक सेलिब्रेटी मोहित मोरची गोळ्या घालून हत्या केली होती. पोलिसांनी सांगितल्यानुसार, मंजीत महाल टोळीने दिनेश मंगू याची हत्या केली होती. दिनेश मंगू हा विकासचा मित्र होता. विकास आणि कपिल सांगवान यांनी दिनेशच्या हत्येसाठी मोहित मोर जबाबदार असल्याचा संशय होता. मोहितनेच मंजीत महाल टोळीला खबर दिल्याची त्यांची खात्री होती. मंजीत महाल आणि कपिल सांगवान टोळीमध्ये मोठा संघर्ष आहे. त्यामुळेच मोहित मोर याची २१ मे २०१९ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.