दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने चीनच्या हेराला अटक केली असून त्याच्याकडून आधार कार्ड आणि भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आले आहे. चार्ली पेंग (वय ३९) असे या संशयित हेराचे नाव असून त्याचे जाळे संपूर्ण भारतात पसरले असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

दिल्लीतील ‘मजनू की टीला’ या भागातून पोलिसांनी चीनच्या नागरिकाला अटक केली. तो चीनचा हेर असल्याचा संशय असून त्याच्याकडून भारतीय पासपोर्ट व आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. भारतीय पासपोर्ट मणिपूरमधील जारी करण्यात आले असून आधार कार्डवर दिल्लीतील पत्ता आहे. गुरुवारी पेंगला दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

पेंगच्या पूर्वोत्तर राज्य आणि हिमाचल प्रदेशमधील हालचालींमुळे तो भारताच्या गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आला. तो पाच वर्षांपूर्वी व्यवसायाच्या निमित्ताने भारतात आला. त्याने भारतीय महिलेशी लग्न केले असून तो भारतात हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर येत आहे.

पेंगला भारतीय कागदपत्र मिळवून देण्यात कोणी कोणी मदत केली होती, त्याचा चीनचा सैन्याशी काही संबंध आहे का, भारतात तो कुठे कुठे फिरला याचा पोलीस अधिक तपास करत आहे. पेंग हा राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील होता, असा दावाही पोलिसांनी केला आहे.