दिल्ली पोलिसाच्या विशेष पथकाने मुंबईचा रहिवासी असलेल्या जान मोहम्मद शेखसह एकूण ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांच्या चौकशीमधून अनेक नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत. एक मोठा घातपात घडवून आणण्याचं या दहशतवाद्यांचं नियोजन होतं, असं सांगितलं जात होतं. दिल्ली पोलिसांचं विशेष पथक या ६ दहशतवाद्यांची चौकशी करत असून त्यातून आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या दहशतवाद्यांना सर्व विस्फोटकांचा वापर करून पुन्हा एकदा मुंबईवरील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांप्रमाणेच स्फोट घडवून आणायचे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या अटकेमुळे मोठ्या घातपाताचा कट उधळल्याचं स्पष्ट झालं आहे.

दिल्ली पोलिसांनी आत्तापर्यंत या प्रकरणात जान मोहम्मद अली शेख उर्फ समीर (वय ४७), उस्मान (वय २२), मूलचंद (वय ४७), झिशान कामर (वय २८), मोहम्मद अबू बकर (वय २३) आणि मोहम्मद आमिर जावेद (वय ३१) अशा सहा जणांना अटक केली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये छापे टाकून यांना अटक करण्यात आली. त्यापैकी जान मोहम्मद अली शेख हा मुंबईच्या धारावीमध्ये वास्तव्यास होता. तो मुंबई सेंट्रलवरून दिल्लीसाठी ट्रेनमधून रवाना झाला असता त्याला कोटा येथून अटक करण्यात आली आहे.

धारावीत राहणाऱ्या दहशतवाद्याची माहिती नव्हती हे ATS चं अपयश? एटीएस प्रमुख म्हणतात…!

दीड किलो आरडीएक्स हस्तगत

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी काही लोकांची नावं घेतलेली आहेत. देशात दहशतवादी कारवायांसाठी स्लीपर सेल म्हणून ही माणसं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. येत्या काही दिवसांत या लोकांचीही धरपकड केली जाणार आहे. देशात पुन्हा एकदा १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटांसारखा हल्ला घडवून आणण्याची त्यांची योजना होती. यासाठी आणलेलं दीड किलो आरडीएक्स देखील पोलिसांनी हस्तगत केलं आहे.

“पैशांसाठी नाही तर…”; पाकिस्तानमध्ये दहशतवादी ट्रेनिंगसाठी जाण्यामागील कारणाबद्दल अटकेतील दहशतवाद्यांचा मोठा खुलासा

महाराष्ट्र एटीएसचा खुलासा

यासंदर्भात नुकतीच एटीएसचे अतिरिक्त संचालक विनीत अगरवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. “मुंबईत रेकी झालेली नाही. मुंबईत रेकी केली जाईल, असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेला एक माणूस आला आणि त्याने रेकी केली, ही बाब पूर्णपणे चुकीची आहे. तो ट्रेनने जात होता, तेव्हाच त्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आणि आम्ही मिळून सर्व कारवाई करू”, अशी माहिती देखील विनीत अगरवाल यांनी यावेळी दिली. “जान मोहम्मदवर कर्ज होतं. आधी तो एक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. ती नोकरी सुटली. त्यानंतर त्याने कर्जाने एक टॅक्सी घेतलीच. त्याचा हफ्ता भरू न शकल्याने बँकेच्या लोकांनी टॅक्सी उचलून नेली. त्यानंतर त्याने पुन्हा कर्जावर एक टू व्हीलर खरेदी केली. त्यामुळे त्याला पैशांची गरज होती. त्यामुळेच कदाचित या कामासाठी त्याला संपर्क करण्यात आला असावा, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे”, असं विनीत अगरवाल यांनी सांगितलं.