२६ जानेवारी रोजी देशाची राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी २ प्रमुख आरोपींना अटक केली आहे. यामध्ये ४५ वर्षीय मोहिंदर सिंग आणि ३० वर्षीय मनदीप सिंग या दोघांचा समावेश आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार या दोघांना जम्मूमधून अटक करण्यात आली आहे. लाल किल्ल्यावर आक्रमक झालेल्या आंदोलकांमध्ये या दोघांचा समावेश असल्याचा दावा दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला आहे. याआधी देखील दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाता मुख्य आरोपी म्हणून गायक कलाकार दीप सिद्धू याला अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत २०० संशयितांची छायाचित्रे देखील जारी केल्याची माहिती मिळत आहे.

कोण आहेत दोघे आरोपी?

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार ४५ वर्षीय मोहिंदर सिंग हे जम्मूच्या सातबारी भागातले रहिवासी आहेत. काश्मीर युनायटेड फ्रंट ऑर्गनायझेशनचे ते अध्यक्ष आहेत. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारप्रकरणी त्यांना कटाचे मुख्य सूत्रधार म्हणून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नीने या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘त्यांना एसएसपी साहेबांनी बोलावलं होतं. जर त्यांना भिती वाटली असती, तर त्यांनी १० लोकांना सोबत नेलं असतं. पण त्यांना वाटलं नियमिच चौकशी आहे. पण जेव्हा ते परत आले नाहीत आणि त्यांचा फोन देखील बंद लागला, तेव्हा मी एका मुलाला तपासण्यासाठी पाठवलं. तेव्हा समजलं की त्यांना अटक करण्यात आली आहे’, अशी तक्रार त्यांच्या पत्नीने केली.

या प्रकरणातील दुसरा आरोपी मनदीप सिंग हा गोले गुजरालचा रहिवाशी आहे. त्याला देखील पोलिसांनी भादंविच्या कलम ३०८, ३९५, १२० ब नुसार अटक केली आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्याच्या एका घुमटावर चढल्याचा आरोप असलेल्या जसप्रित सिंगला अटक केली आहे. त्यासोबतच, हातात तलवारी फिरवतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेल्या मनिंदर सिंगला देखील अटक करण्यात आली आहे.