दिल्ली पोलीस व केंद्रीय गुप्तचर संस्थेची संयुक्त कारवाई
दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा कट आखल्याच्या प्रकरणात पोलिसांनी बारा संशयितांना स्थानबद्ध केले आहे, त्यांच्याकडून स्फोटके व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
दिल्ली व आजूबाजूच्या राज्यात काल रात्री छापे टाकण्यात आले, त्यात ही कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलिस व केंद्रीय गुप्तचर संस्था यांच्या संयुक्त कारवाईत हे छापे घालण्यात आले असून त्यात दहशतवाद विरोधी दलांनी दोन युवकांवर लक्ष केंद्रित केले होते. ते स्फोटके तयार करीत होते असा
संशय असल्याने त्यांना दिल्लीतील गोकुळपुरी भागातून ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्या जाबजबाबातून इतरांची नावे निष्पन्न झाली असून पहाटे एकामागोमाग एक छापे टाकून एकूण बारा जणांना ताब्यात घेण्यात आले अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. हे सर्व जण दहशतवादी संघटनेच्या स्लीपर सेलचे सदस्य असावेत असा संशय
आहे.
देशाच्या राजधानीत व इतर शहरात हल्ले करण्याचा त्यांचा डाव होता. येत्या चोवीस तासात दिल्ली, उत्तर प्रदेश व आणखी काही राज्यात छापे टाकले जाण्याची शक्यता आहे.
आतापर्यंतच्या कारवाईत मोठय़ा प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली असून विशेष पोलिस पथके व गुप्तचर अधिकाऱ्यांनी बारा जणांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. याप्रकरणी चौकशी चालू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.