करोना रुग्णांचे रुग्णालयात होत असलेल्या अपुऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे जीव जात आहे. दुसरीकडे दिल्लीत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा काळाबाजार सुरु असल्याचं चित्र आहे. रुग्णांचे नातेवाईक वाटेल त्या किंमतीत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करत आपल्या नातेवाईकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वैद्यकीय उपकरणांचा काळाबाजार करण्याऱ्या लोकांचं फावत आहे. दिल्ली पोलिसांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा काळाबाजार करण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४१९ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जप्त करण्यात आले आहेत. एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ही टोळी ७० हजार रुपयांना विकत होती.

दिल्ली पोलिसांना एका गुप्त माहितीच्या आधारे एका हॉटेलमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिथे झाडाझडती घेतली. तिथे त्यांना काही जण संशयरित्या काम करत असल्याचं दिसलं. एक जण लॅपटॉपवर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची ऑर्डर घेत असल्याचं पोलिसांनी हेरलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे ९ आणि ५ लिटर क्षमतेचे ३२ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आढळून आले. तसेच थर्मल स्कॅनर आणि एन ९५ मास्कचा साठाही आढळून आला.

धक्कादायक… सात किलो युरेनियमसहीत मुंबईमधून दोघांना अटक; किंमत २१ कोटी रुपये

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सखोल चौकशी केल्यानंतर मंडी विलेज येथील खुल्लर फार्म येथे आणखी साठा असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून ३८७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हस्तगत केले. पोलिसांनी गौरव सिंग, सतीश सेठी, विक्रांत आणि हितेश अशा चौघांना अटक अटक केली असून साथ नियंत्रक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

करोनास्थिती पाहता आता ‘या’ शेजारी राष्ट्रानं भारतीय प्रवाशांवर घातली बंदी

काळाबाजार करण्यासाठी मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे. याप्रकरणी ते अधिक चौकशी करत असून आणखी कोण कोण यात सहभागी याचा तपास केला जात आहे. दुसरीकडे अशा काळाबाजार करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिक करत आहेत.