करोनाच्या संकट काळात मदत करण्याऐवजी वैद्यकीय वस्तूंचा काळाबाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. मृत व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार सध्या संपूर्ण देशभर सुरु आहे. दिल्लीत तर रोज एक प्रकरण समोर येत असल्याने चिंतेत भर पडली आहे. दिल्ली पोलिसांनी अग्निशामक सिलेंडरचं ऑक्सिजन सिलेंडरमध्ये रुपांतर करण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. रवि शर्मा, मोहम्मद अब्दुल आणि शंभू शाह अशी या तिघांची नावं आहेत.

सामाजिक संस्था चालवणारे मुकेश खन्ना यांनी दिल्लीत चढ्या किंमतीत ऑक्सिजन सिलेंडर विकत असल्याची तक्रार पोलिसात केली होती. त्यानंतर पोलिसांनी अपनी कॉलनी परिसरात झाडाझडती घेतली. यावेळी तिथला प्रकार बघितल्यानंतर पोलिसानाच धक्का बसला. ही टोळी रिकाम्या अग्निशामक सिलेंडरचा रंग काढून त्याला हुबेहुब ऑक्सिजन सिलेंडरचं रुप देण्यात मग्न होती. यावेळी पोलिसांनी वितरक रवि शर्माच्या याच्या मुसक्या आवळल्या आणि चौकशी केली. तेव्हा अग्निशामक सिलेंडरचा लाल रंग काढून ऑक्सिजन सिलेंडर प्रमाणे दिसेल असा रंग केला जात असल्याची कबुली दिली. काही अग्निशामक सिलेंडर तर हुबेहुब ऑक्सिजन सिलेंडरसारखी तयारही करण्यात आली होती. त्या सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरलं जात असल्याचे त्याने चौकशी दरम्यान सांगितलं. कारवाईत पोलिसांनी या ठिकाणाहून ५३० अग्निशामक सिलेंडर, २५ ऑक्सिजन गॅस सिलेंडर नोझल, इलेक्ट्रीक ग्राइंडर, स्प्रे पेंट कॅन आणि ४९,५०० रुपये जप्त केले आहेत.

करोनाचा कहर! भारतात गेल्या १० दिवसांत तासाला १५० मृत्यू; अमेरिका, ब्राझीललाही टाकलं मागे

सामाजिक संस्था चालवण्याऱ्या मुकेश खन्ना यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला. त्यांनी या टोळीकडून ४.५ लिटरचे प्रत्येकी ५,५०० रुपये मोजून ऑक्सिजन सिलेंडर खरेदी केले होते. मात्र आणखी मागणी केल्यानंतर त्यांना एका सिलेंडरची किंमत १३ हजार रुपये सांगण्यात आली. काळाबाजार होत असल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

“लोक श्वास घेता येत नसल्याने मरतायत अन् दुसरीकडे अहंकारी मोदींनी नव्या संसदेचं बांधकाम सुरु ठेवलंय”

करोना रुग्णांना ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा होत असल्यानेच काळाबाजाराला ऊत आला आहे. ठिकठिकाणी असे प्रकार घडत असल्याने सामान्य नागरिकही हवालदिल झाले आहेत. अशा प्रकारामुळे रुग्णांचा जीवही जाण्याची वेळ येऊ शकते. या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिक करत आहेत.