दिल्लीचे पोलीस आयुक्त बस्सी यांचे स्पष्टीकरण; देशद्रोही घोषणा दिल्यानेच कन्हैया कुमार याला अटक; गृहमंत्री राजकीय रंग देत असल्याची काँग्रेसची टीका
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा नेता कन्हैयाकुमारयाच्या अटकेचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सोमवारी जोरदार समर्थन केले. विद्यापीठाच्या संकुलात कन्हैयाकुमार याने देशविरोधी घोषणा दिल्या, मात्र या प्रकरणाशी लष्कर-ए-तोयबाचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही, असेही बस्सी यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठातील घटनेच्या वेळी कन्हैयाकुमार तेथे हजर होता, तेथे त्याने भाषणही केले आणि देशविरोधी घोषणा देणाऱ्यांमध्येही तो सहभागी झाला. त्याचा प्रत्यक्ष सहभाग आणि आम्ही गोळा केलेले पुरावे यावरून त्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, असे बस्सी यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.
देशविरोधी घोषणा देत असलेल्यांमध्ये कन्हैयाकुमारचा समावेश होता. संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफजल गुरू याला फाशी देण्यात आल्याच्या विरोधात कार्यक्रम आयोजित करणे हे देशविरोधी आहे, त्याचे भाषणही आक्षेपार्ह होते, असेही ते म्हणाले.
काश्मिरी दहशतवादी आणि विद्यार्थी यांच्यातील लागेबांधे या बाबत विचारले असता ते म्हणाले की, कन्हैयाच्या चौकशीतून जे निष्पन्न झाले त्याचे विश्लेषण केले जात आहे, इतकेच नव्हे तर पोलीस अन्य फरारी विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत, त्यांना लवकरच अटक केली जाईल, असेही ते म्हणाले.