दिल्लीत हेरगिरी केल्याप्रकरणी पाकिस्तानी उच्च आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याला गुरूवारी अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. पोलिसांकडून पाकिस्तानी उच्च आयुक्तालयातील मोहम्मद अख्तर याच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मोहम्मद अख्तरवर गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्याकडून भारतीय लष्कराशी संबंधित काही गोपनीय कागदपत्रे जप्त केल्याचेही वृत्त आहे. सध्या पोलिसांनी मोहम्मद अख्तरची रवानगी चाणक्यपुरी पोलीस कोठडीत केली आहे. मोहम्मदबरोबर त्याच्या दोन भारतीय साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून साडेअकरा वाजता महत्त्वपूर्ण बैठक बोलविण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी चर्चा करण्यासाठी पाकचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना हजर राहण्याचे समन्सही धाडण्यात आले आहे.

दरम्यान, सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटना अजूनही सुरू आहेत. काल रात्रभर आरएसपुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान जखमी झाला होता. या जवानाचा काहीवेळापूर्वीच मृत्यू झाला आहे. पाक सैन्याकडून मोर्टारही टाकण्यात आले. आर. एस. पुरा सेक्टरमधील एका गावातील घरावर हे पडल्याने सहा नागरिक जखमी झाले. आर. एस. पुरा सेक्‍टरमध्ये मंगळवारी पाकच्या गोळीबारात एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता, तर एक जवान हुतात्मा झाला होता. भारताने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान खवळला असून, त्यांच्या लष्कराने आतापर्यंत ४० हुन अधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याविषीय चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावणे धाडले आहे.