पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अध्यात्मिक गुरू असल्याची बतावणी करणाऱ्या पुलकीत महाराजविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चौकशीसाठी पुलकीत महाराजला बोलावणार असून यानंतरच अटकेची कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक संचालकांनी दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. ‘आचार्य पुलकीत महाराज उर्फ पुलकीत मिश्रा या व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अध्यात्मिक गुरु असल्याचे बतावणी केली’, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. पंतप्रधान कार्यालयाला उत्तर प्रदेशमध्ये पुलकीत महाराज या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना बोगस पत्र दिल्याचे समजले होते. या प्रकरणात सीतापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयाच्या नावाने बनावट पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रात पुलकीत नावाच्या व्यक्तीला सुरक्षा पुरवण्याचे आणि त्याच्या निवासाची व्यवस्था करावी, असे म्हटले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा गैरवापर केला गेला असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी विनंती सहाय्यक संचालकांकडून दिल्ली पोलीस आयुक्तांना करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे.