दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. दिल्ली पोलिसांचे पथक शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी धडकले आणि वादाची ठिणगी पडली. केंद्र सरकारचा वरदहस्त असल्याने दिल्ली पोलीस ही दादागिरी करत असल्याचा आरोप आपने केला आहे.

सोमवारी रात्री मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आप आमदारांनी मारहाण केल्याचा आरोप मुख्य सचिव अंशू प्रकाश यांनी केला होता. याबाबत त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपालांकडेही तक्रार केली होती. या प्रकरणी पोलिसांकडेही तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी दिल्ली पोलिसांच्या एका टीमने केजरीवाल यांच्या निवासस्थानी धडक दिली. पोलिसांच्या पथकाने घरातून सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. घरातील २१ कॅमेऱ्यांमधील फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फुटेजशी छेडछाड झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. २० फेब्रुवारी रोजीच आम्ही मुख्यमंत्री कार्यालयात सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. मात्र, फुटेज उपलब्ध न झाल्याने आम्हाला इथे यावे लागले, असे अतिरिक्त पोलीस उपायुक्त हरेंद्रकुमार सिंग यांनी माध्यमांना सांगितले. केजरीवाल यांच्या घरात २१ सीसीटीव्ही कॅमेरे असून हॉलमधील काही कॅमेरे बंद होते, असे सूत्रांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांच्या या कारवाईवर आप नेत्यांनी टीका केली. आज जे केजरीवालांच्या घरी होतंय, ते तुमच्याही घरी होऊ शकते. दिल्लीत जे सुरुये ते योग्य आहे का हे जनतेने ठरवावे, असे आप नेते संजय सिंह यांनी सांगितले. केजरीवाल म्हणाले, माझ्या घरी झाडाझडती सुरु आहे. माझी चौकशी देखील होईल. पण न्या. लोया मृत्यू प्रकरणात अमित शहांची चौकशी कधी होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मला राजकारण येत नाही. मला लक्ष्य केले जात असून भाजपा व काँग्रेसची लोकं २४ तास माझ्या पाठी पडलेले असतात. आम्ही जनतेसाठी काम केले, स्वत:च्या कुटुंबासाठी नाही, असेही त्यांनी सांगितले.