देशमध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. करोनामुळे देशभरामध्ये भितीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने अनेक निर्बंध घातले असून सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी लोकं एकत्र येतील यासाठी राज्य सरकारकडूनही प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे देशासमोर करोनासरखे मोठे संकट उभं असताना दुसरीकडे लोकांच्या वेगवेगळ्या प्रवृत्ती समोर येत आहेत. अशीच घटना दिल्लीमध्ये घडली आहे. येथील एका व्यक्तीने महिलेला करोना असं म्हणून तिच्यावर थुंकल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सदर इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीला महिलेवर थुंकल्याप्रकरणी अटक केली आहे. महिलेचा अवमान केल्याप्रकरणी कलम ५०९ अंतर्गत या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळच्या मणिपूरच्या असणाऱ्या या महिलेला ‘करोना’ असं म्हणून हा व्यक्ती तिच्यावर थुंकला, असं एएनआयने म्हटलं आहे. विजयनगर पोलिसांनी या प्रकरणात संबंधित व्यक्तीला उत्तर दिल्लीमधून अटक केली आहे.

दरम्यान अशाप्रकारे इशान्येमधील लोकांविरोधात शेरेबाजी करण्याचा हा काही पहिला प्रकार नाही. याआधीही काही दिवसापूर्वी ईशान्य भारतामधील विद्यार्थ्यांनी आम्हाला काही लोकं करोना म्हणून चिडवतात अशी तक्रार सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमधून केली होती. काही लोक इशान्य भारतामधून आलेल्या विद्यार्थ्यांचा उल्लेख चिंकी, नेपाळी, चायनीज, करोना व्हायरस असा करत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. आपला आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्हिडीओ शेअर करून असे प्रकार बंद करण्याचं आवाहनदेखील केलं होतं.