नोटीस बजावली; छापा नसल्याचा दावा

नवी दिल्ली : ‘कोविड टूलकिट’ प्रकरणाच्या तपासासाठी दिल्लीच्या विशेष शाखेचे पोलीस सोमवारी ‘ट्विटर इंडिया’च्या दिल्ली आणि गुरुग्राम कार्यालयांत धडकले. ‘टूलकिट’प्रकरणी ट्विटरला नोटीस देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

काँग्रेसच्या कथित ‘टूलकिट’बाबत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रसृत केलेल्या संदेशाला ट्विटरने ‘फेरफार’ प्रकारात वर्गीकृत केले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ट्विटरला रविवारी पत्र पाठवले होते. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांची दोन पथके ट्विटरच्या दिल्ली आणि गुरुग्राममधील कार्यालयांमध्ये धडकली. पोलिसांनी या कार्यालयांमध्ये छापे घातल्याची चर्चा सुरूवातीला होती. मात्र, पोलिसांनी त्याचा इन्कार केला. ‘नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून नोटीस बजावण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक ट्विटरच्या कार्यालयांत गेले. ट्विटर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेली उत्तरे संदिग्ध असल्याने, नोटीस बजावण्यासाठी योग्य व्यक्ती कोण याची आम्हाला खातरजमा करायची होती’, असे दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी चिन्मय बिस्वाल यांनी सांगितले. पोलिसांना माहीत नसलेली काहीतरी माहिती ट्विटरकडे असल्याचे दिसते. ही माहिती तपासाकरता महत्त्वाची आहे, असे बिस्वाल यांनी सांगितले.

‘‘आम्ही ट्विटरला पत्र दिले होते. ट्विटरकडे टूलकिटबाबतची कोणती माहिती आहे आणि त्यांनी त्याबाबतच्या संदेशाला फेरफार प्रकारात का टाकले, हे आम्हाला जाणून घ्यायचे होते’’, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. करोनास्थिती हाताळणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाची प्रतिमा मलिन करणारे ‘टूलकिट’ कॉंग्रेसने तयार केल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र, त्यात तथ्य नसून, चुकीची माहिती पसरवल्याबद्दल भाजप नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉंग्रेसने केली होती. दरम्यान, समाजमाध्यमांच्या ताकदीला सरकार घाबरले आहे. त्यामुळे सरकार कट-कारस्थान रचत आहे, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.