एका पंचवीस वर्षीय महिलेने मागे ठेवलेल्या आत्महत्येच्या चिठ्ठीतील तपशिलाच्या आधारे दिल्लीतील पोलीस निरीक्षकास अटक करण्यात आली आहे. त्याने या महिलेची छळवणूक करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले असा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिनेश कुमार असे या पोलिस निरीक्षकाचे नाव असून तो बाह्य़ दिल्ली भागातील विजय विहार पोलिस स्टेशनमध्ये काम करीत होता. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्य़ाखाली अटक करण्यात आली आहे, त्याला कामावरूनही सकाळीच निलंबित करण्यात आले, असे सह पोलिस आयुक्त व्ही.एस.चहल यांनी सांगितले.
पोलिसांना काल दुपारी तीन वाजता ही महिला उत्तर दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाच्या आवारात बेशुद्धावस्थेत सापडली, नंतर रूग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. तिच्याजवळ चिठ्ठी सापडली असून त्या आधारे पाच पानांची तक्रार पोलिस निरीक्षक दिनेश कुमार याच्याविरोधात दाखल करण्यात आली.
प्राथमिक सकृतदर्शनी तो दोषी असल्याचे दिसून आले असून त्याच्यावर भादंवि कलम ३०६ अन्वये सब्जी मंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे पोलिस उपायुक्त मधुर शर्मा यांनी सांगितले. या महिलेने विष प्राशन केले होते व तिने सदर पोलिस निरीक्षकाने मानसिक व शारीरिक छळ केल्याचे म्हटले होते.