दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन हाताळण्यास दिल्ली पोलीस सक्षम आहेत आणि ते सक्षमपणे ही परिस्थिती हाताळतील, असे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सोमवारी सांगितले.
‘आय अॅम उमर खलिद बट आय अॅम नॉट अ टेररिस्ट’
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात JNU देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी देशद्रोहाचा आरोप असलेले सहा विद्यार्थी रविवारी रात्री उशीरा विद्यापीठाच्या आवारात परतले. यात गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला उमर खालीद याचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर बस्सी यांनी विद्यापीठातील परिस्थिती आम्ही योग्य पद्धतीने हाताळू, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, आरोपी विद्यार्थ्यांवर काय कारवाई करायची, यासाठी आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत. पोलीस परिस्थिती समजून घेऊन योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.
गेल्या ९ फेब्रुवारी रोजी विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमादरम्यान देशविरोधी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार सध्या देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत आहे.