कुस्तीपटू सागर राणा हत्याकांड प्रकरणी आता एक नवीन वळण समोर आले आहे. अटकेत असलेल्या सुशील कुमारला घेऊन दिल्ली पोलीस हरिद्वारला रवाना झाले आहेत. सुशीलला पोलीस एका आश्रमात घेऊन जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सागर राणाच्या हत्येनंतर सुशील सर्वात आधी उत्तराखंडला गेला होता. तो हरिद्वार आणि ऋषिकेशला गेला. पोलिसांच्या सूत्रांनुसार, अजय बक्करवाला आणि सुशील यांना सागरचा फोन हरिद्वार येथे टाकला. या फोनच्या शोधासाठी पोलीस हरिद्वारला गेले आहेत. यापूर्वी दिल्ली पोलीस सुशील आणि अजय यांना घेऊन भटिंडा येथे गेली होती.

हेही वाचा – सुशील कुमारने हत्या केलेल्या ‘त्या’ रात्रीचा व्हिडीओ आला समोर; अमानुषपणे मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद

दिल्ली पोलीस सुशील कुमारवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या तयारीत आहे. संघटित गुन्हेगारीचे आयोजन करणार्‍यांवर ही कारवाई केली जाते. मोक्का लागू केल्यावर सुशील कुमारला सहजपणे जामीन मिळणार नाही. यामध्ये जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. तसेच, पोलीस ६ महिन्यांसाठी आरोपपत्र दाखल करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, सुशील कुमार हा काला झटहेडी आणि नीरज बवाना या गुंडांच्या संपर्कात होता, अशी माहिती आहे.

सुशीलच्या पोलीस कोठडीत वाढ

ऑलिम्पिक पदकविजेत्या सुशील कुमारच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ करण्याचा निर्णय शनिवारी दिल्ली न्यायालयाने घेतला आहे. मागील रविवारी झालेल्या अटकेनंतर न्यायालयाने सुशीलला चौकशीसाठी सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले होते. शनिवारी त्याला पुन्हा न्यायालयात सादर करण्यात आले होते.

हेही वाचा – सुशील कुमारवर दिल्ली पोलिसांची मोठ्या कारवाईची तयारी! जामीन देखील मिळणार नाही

नेमके प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सागर राणा आणि त्याच्या दोन मित्रांना ४ मे रोजी राजधानी दिल्लीतील छत्रसाल स्टेडिअममध्ये बेदम मारहाण केली होती. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सागर राणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मालमत्तेवरील अतिक्रमण आणि ताबा सोडण्यासाठीची धमकी याचे पर्यवसान ४ मे रोजी मारहाणीत घडले आणि त्यात सागरची हत्या झाली, असे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

सुशील कुमारने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक तर २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावले होते.