पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गचे नाव एफआयआरमध्ये नाहीय, असे दिल्ली पोलिसांनी गुरुवारी स्पष्ट केले. फक्त ‘टुलकिट’ची निर्मिती करणाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गने दिल्ली सीमेवर आंदोलन करणार करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देताना हे टुलकिट सुद्धा टि्वटरवर शेअर केले होते. पण तिने नंतर टुलकिटचे ते टि्वट डिलिट केले.

ग्रेटा थनबर्गने शेअर केलेल्या टुलकिटमध्ये प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासंबंधीची माहिती होती. तिने नंतर ते टुलकिट कालबाह्य झाल्याचे सांगत ती पोस्ट डिलीट केली व नवीन अपडेटेड टुलकिट शेअर केले. भारतातील आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठिशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत, असे तिने पहिले टि्वट केले होते. त्यानंतर काही तासांनी तिने टुलकिट शेअर केले होते.

आणखी वाचा- दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतर ग्रेटा थनबर्ग म्हणाली…

शेतकरी आंदोलनाबद्दल टि्वट केल्यामुळे ग्रेटा थनबर्गच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला, अशा आशयाच्या बातम्या माध्यमांनी दिल्या होत्या. पण दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त प्रवीर रंजन यांनी एफआयआरमध्ये कोणाचेही नाव नाहीय. फक्त टुलकिटच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याचे स्पष्ट केले.

“एफआयआरमध्ये आम्ही कोणाचेही नाव घेतलेले नाही. फक्त टुलकिटच्या निर्मात्यांविरोधात हा एफआयआर आहे. दिल्ली पोलिसांकडून याचा तपास सुरु आहे” असे प्रवीर रंजन यांनी सांगितले.

आणखी वाचा- टि्वटरने घेतली अ‍ॅक्शन, कंगनाचे दोन ट्विट हटवले

26 जानेवारीचा हिंसाचार सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या टुलकिटशी संबंधित असल्याचे दिसते असे विशेष पोलिस आयुक्तांनी सांगितले. टुलकिटमध्ये आंदोलनासंदर्भातील माहिती आहे. खलिस्तान समर्थकांनी हे टुलकिट बनवल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे, असे प्रवीर रंजन यांनी सांगितले.

एफआयआरमध्ये अज्ञातांविरोधात १५३ अ (धर्माच्या आधारावर वेगवेगळया गटांमध्ये वैरभाव निर्माण करणं) आणि कलम १२० ब (गुन्हेगारी कट रचण) या कलमातंर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.