राजधानी दिल्लीत आज शेतकरी आंदोलकांनी प्रजासत्ताकदिनानिमित्त ट्रॅक्टर परेडचं आयोजनं केलं होतं. मात्र, शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यामुळे परिस्थिती चिघळली आणि त्यानं हिंसक रुप धारण केलं. दरम्यान, ही ट्रॅक्टर परेड रोखण्यासाठी पोलीसचं चक्क रस्त्यावरच बसले.

नांग्लोई भागातील मुख्य रस्त्यावरुन शेतकऱ्यांची नियोजित ट्रॅक्टर परेड जाणार होती. मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणावरुन ही परेड रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातून उसळलेल्या हिंसाचारामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, या मार्गावरुन जाणारी ट्रॅक्टर परेड रोखताना बळाचा वापर न करता एखाद्या सत्याग्रहाप्रमाणे पोलिसांनी रस्त्यावर बसणे पसंद केले. एएनआयने याबाबत ट्विट केलं आहे.

आणखी वाचा- …अन् संतप्त शेतकऱ्यांमध्ये अडकलेल्या ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यासाठी तो एकटा धावला

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.

आणखी वाचा- शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण, पोलिसांकडून बंदुका हिसकावल्या, बसेसची तोडफोड

तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला असला तरी, मोर्चात फक्त ५ हजार ट्रॅक्टर व तितच्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तीनही मोर्चे दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत काढले जाणार होते.

आणखी वाचा- दिल्लीत शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष

आठवडय़ाभरातील चर्चेच्या पाच फेऱ्यांनंतर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला परवानगी दिली असली तरी या मोर्चामध्ये घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव राजपथावरील पथसंचलन संपल्यानंतर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा सुरू होणार होता. त्यासाठी या दिल्लीच्या सीमांवरील सर्व अडथळे काढले जाणार होते. मात्र, पोलिसांनी हा ट्रॅक्टर मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केल्याने शेतकरी आंदोलक आक्रमक झाले.